मुंबई : मागील काही दिवसांत राज्यात परीक्षा वेळेवर न होणे, अचानक परीक्षा रद्द करणे, पेपर फुटणे असे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यावरून भाजपसह इतर विरोधी पक्ष व परीक्षार्थी विद्यार्थ्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. सरकारकडून प्रयत्न करूनही हे प्रकार थांबत नसल्याने आता सरकारही हतबल झाल्याची स्थिती आहे. निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे (Mahesh Zagade) यांनी यामागचे कारण सांगितले आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada), मुंबईकडून विविध पदांच्या (mhada exam 2021)भरती प्रक्रिया सुरु आहे. कार्यकारी अभियंता (आर्किटेक्चर), उपअभियंता (आर्किटेक्चर), प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर), कनिष्ठ आर्किटेक्ट सहाय्यक, आर्किटेक्चरल अभियांत्रिकी सहाय्यक, सहाय्यक,लिपिक, कनिष्ठ लिपिक, लघुलेखक लेखक, सर्वेक्षक आणि ट्रेसर अशा एकूण ५३५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी रविवारी परीक्षा घेतली जाणार होती.
म्हाडाच्या भरती परीक्षेमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा आहे. काही जणांनी भरतीसाठी मध्यस्थांना पैसे दिले असल्याची चर्चा आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत म्हाडाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली. यापूर्वी देखील आरोग्य खात्याच्या परीक्षेत पेपर फुटीचे प्रकरण समोर आले होते. परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
त्यानंतर महेश झगडे यांनी ट्विट करत याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे बोट दाखवलं आहे. 'नोकर भरती प्रक्रिया वेळेवर न होणे, पेपर फुटणे, पैशांच्या देवाण-घेवाणीबाबत आरोप, ऐनवेळेस परीक्षा रद्द करण्याची नामुष्की ओढावणे याचा अर्थ मुख्यमंत्रीमहोदय तुमचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी कुचकामी झाले आहेत किंवा ते तुमच्याबरोबर नाहीत,' असं झगडे यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.
दरम्यान, ''पेपर पुढे ढकलला का ? पेपर फुटला हे असेल तर मग का त्यांच्यावर कार्यवाही नाही केली तुम्हाला तर आधीच कळलं होत तर मग आधीच cancel करायला पाहिजे मॅडम , आम्ही परिस्थिती नसताना १०००-२००० खर्च करून बस बंद असल्याने औरंगाबादहून आलो. आता कळलं की exam cancel आरोग्य विभागाच्या परीक्षेचे पण तसचं झालं. mhada पण तसचं, सरकार काय करणार तो पर्यंत आमची मानसिकता खचत आहे एका exam ला किती वेळेस जावे, अशी आमची परिस्थिती नाही, '' अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे.
आरोग्य विभागाची परीक्षाही ऐनवेळी पुढे ढकलल्याने परीक्षार्थी त्रस्त झाले होते, आता म्हाडाची परीक्षा देखील काही कारणाने पुढे ढकलण्यात आल्याचे शनिवारी मध्यरात्री म्हाडाने पत्र प्रसिद्ध करून उमेदवारांना कळविले, तोपर्यत अनेक विद्यार्थी हे आपल्या गावाहून परीक्षा केंद्रांकडे रवाना झाले होते. प्रवाशात त्यांना ही परीक्षा पुढे ढकलल्याचे कळल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.