Rutuja Latake  Sarkarnama
मुंबई

Andheri Election Result : ठाकरेंच्या शिवसेनेने गुलाल उधळला..; ऋतुजा लटके विजयी

Andheri By Poll Election मतमोजणीच्या एकूण १९ फेऱ्या पार पडल्या.

अनुराधा धावडे

Andheri By Poll Election मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके 53 हजार 471 मताधिक्याने विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 66 हजार 247 मते पडली, तर नोटाला 12 हजार 776 मते पडली.

दरम्यान, 2019 मध्ये झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघाच्या विधानसभा निवडणुकीत जवळपास 1 लाख 47 हजार 117 मतदान झाले होते. त्यापैकी रमेश लटके यांना 62 हजार 773 मतं मिळाली, तर मुरजी पटेल यांना 45 हजार 808 मतं मिळाली होती.

विजय निश्चित झाल्यानंतर ऋतुजा लटके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि माजी मंत्री अनिल परब यांच्या यांनी मला संधी दिली. लवकरच मातोश्री'वर जाऊन मी उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. हा माझा नव्हे तर रमेश लटके यांचा विजय आहे. अशा भावना त्यांनी काही वेळापुर्वीच व्यक्त केल्या.

अंधेरीचा विकास हे त्यांचं ध्येय होते. ते ध्येय मी पुर्ण करणार, असा विश्वासही लटके यांनी यावेळी व्यक्त केला. लोकांची मला साथ आहे. माझे कुटूंब माझ्या सोबत होतं म्हणून मी आज इथे आहे. माझ्या पतीच्या पुण्याईमुळे आज मी इथे आहे. मला पाठिंबा दिलेल्या सर्वांचे मी आभार मानते, आतापर्यंतचा निकाल पाहता ९० टक्के लोकांनी मला साथ दिली. पण ज्यांनी नोटाला मतदान केले ते सर्व भाजपचे मतदान आहे. अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

दरम्यान, अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत मोठा गदरोळ माजला होता. भाजपकडून मुरजी पटेल यांनी, तर शिवसेनेकडून ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र, माघारीच्या आदल्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजपला आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्याच ठिकाणी लटके यांचा विजय निश्चित झाला होता. मात्र, मध्यंतरी काही पक्षाकडून ‘नोटा’चा पर्याय अवलंबवावा, असे आवाहन करण्यात आल्याची चर्चा होती. मतमोजणीत नोटाला पडलेले मते पाहता ही चर्चा खरी होती की काय, असे दिसून येत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT