Sachin Waze Sarkarnama
मुंबई

चांदीवाल समितीसमोर वाझेनं तोंड उघडलं अन् दिली अनेक प्रश्नांची उत्तरे

चांदीवाल समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याची उलटतपासणी घेण्यात आली.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह (Param Bir Singh) यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल यांची एक सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती (Chandiwal Committee) नेमली आहे. या समितीसमोर आज बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Waze) याची उलटतपासणी घेण्यात आली. या तपासणीदरम्यान, वाझेने अनेक प्रश्नांचा उलगडा केला आहे.

बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे याला नुकतेच चांदीवाल समितीसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्याने तो केवळ एक छोटे प्यादे असल्याचे सांगितले होते. तसेच, समितीवर पूर्णपणे विश्वास असल्याचेही त्याने स्पष्ट केले होते. त्याने स्वत:ला प्यादे म्हटले असल्याने मोठे खेळाडू कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. देशमुखांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांच्या वतीने शेखर जगताप यांनी आज वाझेची उलट तपासणी घेतली. यात वाझेंनी अनेक प्रश्नांची उत्तर दिली आहे. ही उलटतपासणी संपली असून, पुढील सुनावनी उद्या दुपारी 3 वाजता होणार आहे.

संजीव पालांडे यांचे वकील आणि सचिन वाझे यांच्यातील प्रश्नोत्तरे

प्रश्न - अनिल देशमुख यांनी तुम्हाला पुन्हा पोलीस सेवेत रुजू होण्यास सांगितले होते, याचे पुरावा तुमच्याकडे आहेत का?

उत्तर - माझ्याकडे विनंती पत्राशिवाय इतर कोणतेही रेकॉर्ड नाही.

प्रश्न - सप्टेंबर 2020 ते डिसेंबर 2020 गुन्हे गुप्तवार्ता विभागामध्ये (सीआययू) असताना तुम्हाला कोणती प्रकरणे तपासासाठी देण्यात आली होती? तुम्ही परमबीरसिंह यांना याची माहिती दिली होती का?

उत्तर - मला कोणतीही प्रकरणे तपासासाठी देण्यात आलेली नव्हती.

प्रश्न - नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 मध्ये बार ट्रेड आणि हॉटेल अभ्यागत होते का?

उत्तर - मला आठवत नाही

प्रश्न – तुम्ही सीआययूचे प्रभारी असताना डिसेंबर 2020 मध्ये महेश शेट्टी किंवा दया पुजारी यांना भेटला होतात का?

उत्तर - मला आठवत नाही

प्रश्न - सीआययूने नोव्हेंबर आणि डिसेंबर 2020 मध्ये मुंबई शहरातील बार आणि रेस्टॉरंटवर छापे, झडती किंवा जप्तीची कारवाई केली होती का?

उत्तर- अशी कारवाई रेकॉर्डवर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करता येणार नाही.

प्रश्न - तुम्ही फेब्रुवारी महिन्यात कुठला गुन्ह्याचा तपास करत होता?

उत्तर - मी सीआर नंबर डीसीपी सीआयडी 40 चा तपास करत होतो.

प्रश्न - ऑगस्ट 2020 ते फेब्रुवारी 2021 या काळात कुठल्या गुन्ह्याचा वैयक्तिक तपास करत होता का ?

उत्तर - वैयक्तिक नाही पण युनिट इंचार्ज म्हणून मी सीआयूतील गुन्ह्यांच्या तपासावर देखरेख ठेवत होतो.

प्रश्न - तुम्हाला सीआययूतून काढले तेव्हा परमबीरसिंह यांनी गुन्ह्याच्या तपासाबाबत काही सूचना केल्या होत्या का ?

उत्तर - नाही. मला या गुन्ह्यांसंदर्भात परमबीरसिंह यानी थेट मार्गदर्शन केले नाही. माझा वरिष्ठांकडून मार्गदर्शन होत होते. ते अधिकृतरित्या नियमानुसार होते.

प्रश्न - संजीव पालांडे याना ओळखता का ?

उत्तर - गृहमंत्र्यांचे पीए होते म्हणून ओळखतो

प्रश्न - तुम्ही पालांडे याच्याशी जवळीक अथवा मैत्री होती का ?

उत्तर - नाही

प्रश्न - महत्वाच्या गुन्ह्यांसंदर्भातच गृहमंत्र्याकडे जात होता त्यावेळी पालांडे यांच्याशी चर्चा करायचा का?

उत्तर - हो

प्रश्न - 20 मार्च २०२१ रोजी परमबीरसिंह यांनी 100 कोटी रुपयांच्या वसुलीबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या आरोपांबाबत माहिती होते का ?

उत्तर - मला आठवत नाही

प्रश्न - परमबीरसिंह यांच्या पत्रात म्हटल्याप्रमाणे तुम्ही ज्ञानेश्वरी बंगला परिसरात फेब्रुवारी 2021 मध्ये भेट दिली होती का आणि पालांडेला भेटला होता का?

उत्तर - आम्ही भेटलो होतो.

प्रश्न - या भेटीचे पुरावे आहेत का ?

उत्तर - माझाकडे पुरावे नाहीत.

प्रश्न - पालांडे यांनी तुमच्याशी पैशासंदर्भात काही चर्चा केली होती का?

उत्तर - आमचे तसे काहीच बोलणे झाले नाही.

दरम्यान, आज परमबीरसिंहांच्या वकिलांनी आयोगासमोर हजेरी लावली. परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप ऐकीव माहितीवर केले होते. त्यामुळे समितीसमोर साक्षीदार म्हणून ते हजर होण्यास कोणतेही महत्व नाही. त्यांनी काही अधिकाऱ्यांकडून ऐकलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप करण्यात आले होते. याबाबत परमबीरसिंहांना थेटपणे कोणतीही माहिती नव्हती. ते आयोगासमोर साक्षीदार म्हणून हजर झाले तरी कायद्यानुसार त्याला काही महत्व असणार नाही. कारण ते सांगतील ती माहिती इतरांनी त्यांना सांगितलेली असेल, असे परमबीरसिंहांच्या वकिलाने आयोगाला सांगितले. परमबीरसिंह साक्षीदार म्हणून हजर राहणार नसले तरी ते आयोगासमोर पुढील आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT