Sada Sarvankar Latest News
Sada Sarvankar Latest News Sarkarnama
मुंबई

Sada Sarvankar : सदा सरवणकरांच्या अटकेची मागणी; पण खरंच होणार अटक ?

सरकारनामा ब्यूरो

Ambadas Danve On Sada Sarvankar Firing : मुंबई - मागील वर्षी गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेरील जमावाच्या दिशेने गोळी झाडल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते व आमदार सदा सरवणकर व त्यांच्या इतर सहकाऱ्यांविरोधात आर्म्स कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करूनही सबळ पुराव्याअभावी अटक करण्यात आली नव्हती.

मात्र, आता प्रयोगशाळेने ती गोळी त्यांच्याच बंदुकीतून झाडल्याचा सबळ पुरावा सादर केला आहे. तरीदेखील सरवणकर यांना अद्याप अटक करण्यात का आली नाही असा खडा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला आहे.

गणेश विसर्जनादरम्यान पोलीस ठाण्याबाहेर जमावाच्या दिशेने केलेल्या गोळीबार प्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेले काडतुस हे आमदार सदा सरवणकर यांच्या जप्त केलेल्या परवानाधारक बंदूकीतील असल्याचे कलिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या बॅलेस्टिक अहवालातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे दोषी असलेल्या आ. सरवणकर यांना अटक करून या गोळीबाराचा तपास जलद गतीने करण्यात यावा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी स्वरूपात केली आहे.

एखादे प्रकरण, घटना घडल्यावर शासन व मुंबई पोलिसांकडून त्वरित कारवाई होते ती या प्रकरणी होताना दिसत नाही. त्यामुळे फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून दोषींवर योग्य ती कलमे लावून त्वरितअटक करण्याचे आदेश देण्याची मागणी दानवे यांनी केली आहे.

या घटनेतून काही अनुचित प्रकार घडला असता तर राज्यात कायदा व सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण झाली असती. याप्रकरणी सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यदर्शीचा शोध घेऊन त्यांचा जवाब नोंद करण्यासाठी करण्यात येणारी दिरंगाई म्हणजे सदर गुन्ह्यांत पोलीस जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत किंवा राजकीय दबावापोटी दोषींना अटक करण्यात टाळाटाळ करत आहे, असा संशय निर्माण झाल्याने दानवे यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT