Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political News
Sambhajiraje Chhatrapati News, Kolhapur News, Political News Sarkarnama
मुंबई

आम्ही तुमच्यासोबत पण दबाव आहे! संभाजीराजेंना होता सर्वपक्षीय आमदारांचा पाठिंबा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीला सामोरे जाणार नसल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी जाहीर केलं आहे. पण ही माघार नसून माझा स्वाभिमान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या फॉर्मवर काही आमदारांनी सह्याही केल्या होत्या. भाजपसह (BJP) सर्व पक्षाच्या आमदारांनी आपल्या पाठिंबा असल्याचे सांगितले होते. पण त्यांच्यावर पक्षीय दबाव होता, असा दावाही संभाजीराजेंनी यावेळी केला. (SambhajiRaje Chhatrapati Latest Marathi News)

संभाजीराजे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत राज्यसभेच्या निवडणुकीबाबत मन मोकळं केलं. निवडणुकीसाठीचा ड्राफ्ट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व माझ्या सुचनेनुसार तयार झाला होता. पण मुख्यमंत्र्यांनी शब्द मोडला असं सांगत संभाजीराजे यांनी नाराजी व्यक्त केली. पण आपण कोणत्याही पक्षावर नाराजी, कुणाचाही द्वेष नाही, असंही त्यांनी सांगितले.

'ज्या आमदारांनी माझ्या फॉर्मवर सह्या केल्या, त्यांचा मी मनापासून आभारी आहे. आयुष्यभर मी त्यांच्या पाठिशी उभा राहणार आहे. त्यांनी केव्हाही हाक द्यावी, संभाजी छत्रपती त्यांच्या पाठिशी असेल. सर्वपक्षीय आमदारांवर दबाव होता. त्यांनी माझ्याशी संपर्क साधून हे सांगितले. आम्ही तुमच्याबरोबर आहोत पण आमच्यावर दबाव आहे, असं या आमदारांनी सांगितल्याचा दावा संभाजीराजे यांनी केला आहे.

घोडेबाजार होऊ नये म्हणून माघार

शिवसेनेने मला ऑफर दिली होती. तुम्ही पक्षात प्रवेश करा लगेच खासदारकीचं तिकीट दिलं असतं. मी घेऊ शकलो असतो पण मी तसं केलं नाही. कालपासून अनेक आमदारांचे फोन होते, राजे निवडणूक लढवा. पण मला खात्री होती, या निवडणुकीत घोडेबाजार होणार, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण माझी उमेदवारी त्यासाठी नव्हती. सगळ्या पक्षातील लोकांनी मला मदत करावी, यासाठी माझी उमेदवारी होती. माझं व्यक्तिमत्व निष्कलंक आहे, हे विचारात घेऊन मदत करावी. पण तसं होताना दिसत नाही. घोड़ेबाजार होऊ नये, म्हणून मी या निवडणुकीला सामोरे जाणार नाही. पण ही माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे, असं संभाजीराजे म्हणाले.

म्हणून मी आवाहन केलं...

माझा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढची राजकीय दिशा कशी असणार हे सांगण्यासाठी 12 मे रोजी पुण्यात दोन राजकीय निर्णय जाहीर केले होते. राज्यसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून मी पुढे येणार असल्याचे त्यावेळी सांगितले होते. त्यावेळी मला सगळी गणितं माहिती होती. पुढचा प्रवास किती खडतर आहे, हे माहिती होतं. पण मला स्वत: अनुभवायचं होतं. मी पंधरा ते वीस वर्ष पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. खासदारकी असताना समाजाची भूमिका प्रामाणिकपणे मांडत होते. त्यामुळे मी आवाहन केलं की, सर्व पक्षातील लोकांनी मला राज्यसभेत पाठवावं, असं संभाजीराजेंनी सुरूवातीलाच सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT