मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून भाजप नेते सातत्याने महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghdi Government) नेत्यांवर आरोप करताना दिसत आहे. या सर्वांना आता शिवसेनेने थेट इशारा दिला आहे. आम्ही सहन केले आता बघाच, असा निर्वाणीचा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत दिला आहे. इतकेच नव्हे तर भाजपच्या साडेतीन लोकांना तुरुंगात टाकणार असल्याचेही सांगितल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या रडारवर भाजपचे ते साडे तीन नेते कोण असा सवाल उपस्थित होत आहे.यासाठी ते आज पत्रकार परिषदही घेणार आहेत.
त्यापूर्वी त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. पुढच्या काही दिवसातचं भाजपाचे साडेतीन लोक अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील, याबाबत आज मी पत्रकार परिषदेत बोलणारच आहे. सो सोनार की एक लोहार की, असे म्हणत, संजय राऊतांनी आता शड्डूच ठोकला आहे. असे म्हणत संजय राऊतांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.
त्याचवेळी त्यांनी गुजरातमध्ये उघडकीस आलेल्या देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यावरही भाष्य करत तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले आहे. गुजरातमध्ये देशातला सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. २ वर्षांपासून हे सर्व सुरु आहे. आता इडी आणि इतर तपास यंत्रणांनी तिथेही जाऊन तपास करावा, त्यातील आरोपी कोण आहेत, त्यामागील सुत्रधार कोण आहेत, याचा तपास करावा. राष्ट्राच्या सुरक्षेसाठी तपास यंत्रणा काम करत असतील तर त्यांना सर्व सहकार्य करणार. पण देशातला सर्वात मोठा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
दरम्यान संजय राऊत यांच्या एका ट्वीटचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून त्यावरुन तर्कवितर्क काढले जात आहेत. संजय राऊत यांनी दिवंगत कवी राहत इंदौरी यांचा एक शेर ट्वीट केला आहे. “शाख़ों से टूट जाएँ वो पत्ते नहीं हैं हम, आँधी से कोई कह दे कि औक़ात में रहे – राहत इंदौरी”. असा शेर राऊतांनी ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी हा शेर कोणाला उद्देशून आहे, हे कदाचित संध्याकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेतच कळेल. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेत ते कोणाकोणाची नावे घेतात, याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.