Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : ईडीने जप्त केलेली रोकड अयोध्या दौऱ्यासाठी ; एकनाथ शिंदेंचेही नाव

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एक हजार ३४ कोटींच्या पत्रा चाळ पुनर्वसन गैरव्यवहार प्रकरणी सुमारे १७ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल (रविवारी) मध्यरात्री अटक केली. सकाळी ७ वाजेपासून ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत राऊतांची घरी आणि ईडी (ed) कार्यालयात चौकशी झाली. (Sanjay Raut ed inquiry latest news)

आज (सोमवारी) सकाळी ११.३० वाजता त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी त्यांची सकाळी साडेनऊ वाजता वैद्यकीय चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती राऊतांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी दिली.

राऊत यांच्या घराची झडती घेताना ईडीच्या पथकाच्या हाती साडेअकरा लाख रुपयांची रोकड लागली होती. मात्र, यापैकी १० लाख रुपये अयोध्या दौऱ्यासाठी जमवलेले शिवसेना पक्षाचे असून त्यात एकनाथ शिंदे यांचेही नाव लिहिले आहे, असेही सुनील राऊत यांनी सांगितले.

शिवसेनेचे प्रवक्ते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊतांना अखेर ईडीने काल मध्यरात्री अटक केली. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा अटक करण्यात आली.

रविवारी दिवसभर राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी गर्दी केली होती. शिवसैनिकांनी या वेळी ईडीविरोधात घोषणाबाजी करत कारवाईचा निषेध केला. राऊत यांनी ‘आपण झुकणार नाही, शिवसेना सोडणार नाही,’ असे स्पष्ट केले. गळ्यात भगव्या रंगाचा गमछा घातलेल्या राऊत यांनी घराबाहेर येताच हात उंचावून शिवसैनिकांना अभिवादन केले. राऊत यांना बॅलार्ड इस्टेट परिसरातील ईडी कार्यालयात आणण्यात आले. तिथेही त्यांची चौकशी करण्यात आली. दरम्यान,नवीन समन्स बजावल्याने त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी कार्यालयात नेण्यात आले होते.

आई,पत्नीला अश्रू अनावर

संजय राऊत यांच्यासोबतच त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचीही चाैकशी झाली. या वेळी राऊत यांची ८४ वर्षीय आई,भाऊ आमदार सुनील राऊत घरातच होते. सायंकाळी ईडी पथकासोबत राऊत बाहेर पडताना राऊत यांच्या आई आणि पत्नीच्या डोळ्यात अश्रू तरळले. या वेळी घराच्या खिडकीत उभ्या राहून या दोघींनी बाहेर जमलेल्या शिवसैनिकांना हात दाखवून आभार व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT