Nana Patole Sarkarnama
मुंबई

सावरकरांना ब्रिटिशांची पेन्शन का? 'नव इतिहासकारांनी' सांगावे : फडणवीसांना टोला

Nana Patole : राहुल गांधी खरे बोलले, त्यात काही चुकीचे नाही? सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायचे!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व सावरकरांवर टीका केली. त्यावर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकांडतांडव करण्याची काही गरज नाही. राहुल गांधी अगदी खरे बोलले आहेत. त्यात काहीच चुकीचे नाही? सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायचे, याचे अनेक दाखले इतिहासात आहेत. सावरकरांना इंग्रजांकडून मिळणारी ही पेन्शन नेमके कशासाठी मिळत होती? याचा खुलासा फडणवीसांनी करावा, असे थेट आव्हानच काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

नाना पटोले पुढे म्हणाले की, भारताच्या स्वातंत्र्य संग्रमात संपूर्ण देश काँग्रेसच्या झेंड्याखाली, जात, धर्म, प्रांत सारे भेद विसरून एक झाला होता. स्वातंत्र्यसंग्रमात संघाचे आणि सावरकरांचे यांचे काडीचेही योगदान नाही. उलटपक्षी स्वातंत्र्यसंग्रमात सावरकर व संघाची भूमिका ब्रिटिशांना साथ देणारी होती.

‘चले जाव, भारत छोडो’ आंदोलनात संपूर्ण देश एकवटलेला असताना, संघ कुठेच नव्हता. ब्रिटिशांविरूद्ध लढण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची सुरूवात केली. मात्र सावरकर यांनी ब्रिटिश सैन्यामध्ये भारतीय तरूणांनी भरती व्हावे, असे आवाहन केले होते. ज्या काळ्या पाण्याच्या शिक्षेचा दाखली नेहमी दिला जातो, ही फक्त सावरकरांनाच झाली असे नाही. तर त्यांच्याबरोबरच्या तब्बल १४९ स्वातंत्र्यसैनिकांनाही झाली. पण काळ्या पाण्याच्या शिक्षेतून सावरकरांची ब्रिटिशांनी सुटका केली, हा इतिहास आहे, असेही पटोले म्हणाले.

पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनादेखील तब्बल ११ वर्षे तुरुंगवास भोगावा लागला. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह अनेकांनी कारागृहात शिक्षा भोगली. हजारोंनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. भारताच्या फाळणीची बीजे ही स्वत: सावरकरांनीच मांडलेल्या द्विराष्ट्रवाद सिद्धांतामध्येच दडलेले आहे हे ‘नवे इतिहासकार’ फडणवीसांना माहिती असेल.

लोकांचा बुद्धीच्छंल करणे ही आरएसएस व भाजपची पूर्वीपासूनची पद्धती राहिली आहे. अंदमानातल्या कारागृहात असताना सावरकर बुलबुल पक्षावर स्वार होऊन, भारतभ्रमण करीत होते, असा बनावही कर्नाटकमधल्या भाजप सरकारने शालेय पुस्तकातून केला. खोटे दावे पसरवणे कामच कायम भाजपाकडून केले जाते, असेही पटोले म्हणाले.

काय म्हणाले होते राहुल गांधी :

संघाने आणि सावरकरांनी नेहमीच ब्रिटिशांना मदत केली. सावरकरांना इंग्रजांकडून पैसे मिळत असे. स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप किंवा संघ कुठेही नव्हता, हे सत्य त्यांना लपवता येणार नाही.

काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे नेते देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहेत. आम्ही फॅसिस्ट नाही. आमचा पक्ष नेहमीच संवादावर विश्वास ठेवून पुढे मार्गक्रमण करतो. निवडणूक जिंकण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काम करावे लागेल. देशात समूहा-समूहांमध्ये द्वेष आणि हिंसाचार घडवणे हे देशविघातक कृत्य आहे. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्यांशी आम्ही लढणार आहोत, आपल्यालाही लढावं लागेल, असे राहुल गांधी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT