मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजारात (NSE) हिमालयातील योगीच्या सांगण्यावरून नियुक्त्या झाल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला होता. शेअर बाजाराच्या (Share Market) तत्कालीन व्यवस्थापकीय संचालिका व मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण (Chitra Ramkrishna) यांच्या काळात हा प्रकार घडला होता. या प्रकरणानंतर आता एनएसईचा कारभार व्यावसायिक, तसेच पारदर्शक पद्धतीने होत असल्याचे स्पष्टीकरण सिक्युरीटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) दिले आहे.
एनएसईमध्ये 2013 ते 2016 दरम्यान एमडी व सीईओ असलेल्या चित्रा रामकृष्ण यांनी आनंद सुब्रह्मण्यम यांची स्ट्रॅटेजिक अॅडव्हायजर म्हणजेच सल्लागारपदी नियुक्ती केली होती. रामकृष्ण यांनी त्यांना दरवर्षी वाढीव मानधन दिल्याचे प्रकरण समोर आले होते. याप्रकरणी सेबीने एनएसई, चित्रा रामकृष्ण, सुब्रह्मण्यम आदी सहा जणांना नऊ कोटी सहा लाख रुपयांचा दंड केला आहे. या प्रकरणात एकंदरीतच शेअर बाजारासह निगडित सर्वांच्या प्रतिमेवर परिणाम झाला होता. आता एनएसईकडून सेबीचे सर्वच आदेशांचे पालन केले जात असून, एनएसईच्या कारभारावर सेबीचे लक्ष आहे, असे सेबीने स्पष्ट केले आहे.
चित्रा रामकृष्ण यांचे हे प्रकरण दहा वर्षे जुने आहे, त्यानंतर मागील काही वर्षांत एनएसईचे संचालक मंडळ, तसेच व्यवस्थापन या स्तरावरही बदल झाले आहेत. अशा सर्व संबंधित संस्थांचे प्रशासन, त्यांच्या समित्या, त्यावर देखरेख करण्याची पद्धती, त्यांचा कार्यकाळ, कर्तव्यात कसूर झाल्यासंदर्भातील जबाबदारी यात बदल झाला आहे. असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी आता त्यांच्यावरील नियंत्रणेही कठोर झाली आहेत. एनएसई व अशा सर्व संस्थांच्या कारभारावर सेबी बारकाईने लक्ष ठेऊन आहे.
नियंत्रण प्रणाली सुनिश्चित करण्यासाठी एनएसईने मागील काही वर्षांत सेबीच्या विविध सूचनांचे पालन केले आहे. याचबरोबर नियंत्रणाबाबत तांत्रिक पावले उचलण्यासह सर्व उपाययोजना केल्या आहेत. पारदर्शकता, तसेच प्रशासनासंदर्भात एनएसई सर्वोच्च मानकांचे पालन करीत आहे. चित्रा रामकृष्ण यांच्याशी निगडित प्रकरण तडीस नेण्यासाठीही एनएसई नियामकांना पूर्णपणे सहकार्य करीत आहे, असेही सेबीने म्हटले आहे. या प्रकरणात एनएसईमधील काही गोपनीय माहितीही चित्रा रामकृष्ण आणि सुब्रह्मण्यम यांनी बाहेर पाठविल्याचे सेबीने आदेशात म्हटले आहे. यासंदर्भात आर्थिक गैरप्रकार झाल्याचा ठपकाही सेबीने ठेवला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.