Jayant Patil-Sharad Pawar
Jayant Patil-Sharad Pawar Sarkarnama
मुंबई

Jaynt Patil On Sharad Pawar : शरद पवारांनी राजीनामा मागे घेताच जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना केले हे आवाहन...

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : देश आणि राज्यातील नेते, कार्यकर्ते यांच्या आग्रहानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज सायंकाळी मागे घेतला. त्यानंतर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत राज्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना ‘हा आनंद गावोगावी आणि प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा’ असे आवाहन केले आहे. (Sharad Pawar withdrew his resignation, Jayant Patil appealed to the NCP Activist's...)

माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपल्या प्रेमाने मी भारावून गेलो. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या समितीने घेतलेला निर्णय माझ्यापर्यंत पोहोचविण्यात आला आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मी मागे घेत आहे, अशी घोषणाही शरद पवार (Sharad Pawar) यांनी केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकच जयघोष केला.

शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर करताचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनीही ट्विट करत आपला आनंद साजरा केला. ट्विटमध्ये ते म्हणतात की, आदरणीय शरद पवारसाहेब यांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून राज्यभरातील कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यामध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण आहे. राज्यभरातील सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंद गावोगावी व प्रत्येक चौकाचौकात साखर वाटून साजरा करावा असे आवाहन मी करत आहे.

अजित पवारांच्या गैरहजेरीवर पवार काय म्हणाले

अजित पवार पत्रकार परिषदेला नसले तरी आमचे बाकीचे सहकारी उपस्थित आहेत. सहसा पत्रकार परिषदेला नेतृत्वाची संपूर्ण फळी कधी बसत नाही. माझ्या सर्व सहकाऱ्यांनी आज बैठक घेतली. त्यांनी ठराव केला. त्या ठरावात मी माझा निर्णय बदलावा, असा आग्रह त्यांनी सूचित केला. पक्षाच्या समितीने केलेला ठराव तो माझ्याकडे पोचविण्याचे काम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार, ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि अन्य राज्यांतील सहकारी यांनी एकत्रित येऊन केले. यासंबंधीच्या भावना त्यांनी माझ्याकडे स्पष्ट केल्या आहेत. त्यामध्ये पक्षाचे संपूर्ण नेते होते. कोणी आहे किंवा कोणी नाही, अशा प्रकारचा विचार करण्याची अजिबात गरज नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी अजितदादांच्या गैरहजेरीबाबतच्या प्रश्नावर भाष्य केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT