Sharad Pawar  Sarkarnama
मुंबई

Sharad Pawar News : शरद पवारांचा राष्ट्रवादीच्या आमदारांना वैयक्तिक फोन; 'हे' आहे कारण

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : राज्याच्या राजकारणात लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. तसेच महाराष्ट्रात 'ऑपरेशन कमळ'साठी भाजप अॅक्टिव्ह झालं असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी देखील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली होती.

अखेर अजित पवारांनीच आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचं स्पष्ट करत या चर्चांवर पडदा टाकला. परंतू, मागील काही तासांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करुन संवाद साधला असल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडाच्या चर्चांनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यामुळेच शरद पवार सतर्क झाले असून सावधगिरीचे पावले उचलण्यास सुरुवात केली असल्याचं बोललं जात आहे. अजितदादांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर मंगळवारी रात्री शरद पवाराच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांसह बैठक झाली. तसेच राष्ट्रवादीच्या आमदारांशी वैयक्तिक फोन करुन संवाद साधला असल्याचं बोललं जात आहे.

पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांशी संवाद साधत आहे. यावेळी पवारांकडून पक्षाची पुढील काळातील वाटचाल, ध्येय धोरणं, निवडणुकांसाठी रणनीती यांसारख्या अनेक मुद्द्यांवर आमदारांशी चर्चा केली जात आहे. तसेच बंडाबाबतच्या चर्चांवरही भाष्य करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

अजित पवारांनी भाजपा प्रवेशाच्या चर्चांवर आपली रोखठोक भूमिका स्पष्ट केल्यानंतर पडद्यामागे अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादीतील अंतर्गत वरिष्ठ नेतेमंडळी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षनेते अजित पवार यांची भेट घेतली आहे. सकाळपासून सुनिल तटकरे ,छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि अनिल देशमुख देवगिरी बंगल्यावर भेट घेतली आहे.

अजित पवारांचं स्पष्टीकरण तरीही…

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या बंडाच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर अजित पवार म्हणाले, "इतर पक्षाचे नेते काय म्हणातात हा त्यांचा अधिकार आहे. आमच्या पक्षातील कुणी काही बोलले नसताना माझ्याबद्दल ज्या चर्चा सुरू आहेत त्यात काहीच तथ्य नाही. मला जो काही निर्णय घ्यायचा झाला तर तो मी जाहीरपणे प्रसारमाध्यमांना सांगेन असंही पवार म्हणाले.

'देवगिरी'बाहेर विनाकारण कॅमेरे लावून बसण्यात काही अर्थ नाही. यामुळे राष्ट्रवादीच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. मी व माझे सहकारी बदनाम होत आहेत. मी जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. आता हे 'अॅफेडिव्हीट'वर लिहून देऊन का? तुम्हीही सभ्यता पाळा असंही पवारांनी सुनावले होते.

शरद पवार काय म्हणाले होते?

अजित पवारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आल्यानंतर शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सध्या ही चर्चा तुमच्या मनात आहे, ती आमच्याा कुणाच्याही मनात नाही. या चर्चेला अजिबात महत्त्व नाही. काहीतरी बातम्या तयार करण्याचं काम कुणीतरी करतंय,त्याला काहीही अर्थ नाही असं विधान केलं होतं. तसेच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुरतं सांगू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षात काम करणारे आमचे सगळे सहकारी एका विचाराने पक्षाला शक्तीशाली कसं करायचं या भूमिकेत आहेत. त्याशिवाय दुसरा कुठलाही विचार कुणाच्या मनात नाही असंही शरद पवार म्हणाले होते.

(Edited By DeepaK Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT