Sharad Pawar-Dilip Walse Patil-Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Walse Patil On His Statement: ‘ती’ दिलगिरी गैरसमजाबद्दल; पवारांबाबतच्या विधानावर वळसे पाटील ठाम, अजितदादांचा संपूर्ण गट पाठीशी...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Political News: सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विधानावरून उठलेले वादंग शांत होण्याचे नाव घेताना दिसत नाही. वळसे पाटील यांनी व्यक्त केलेली दिलगिरी ही गैरसमजाबद्दल आहे, विधानाबद्दल नाही. ते आपल्या विधानावर ठाम आहेत. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली. ते करताना अजितदादांचे राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमातील व्हिडिओ ट्विट करत वळसे पाटील यांच्या पाठीशी संपूर्ण गट उभा राहिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल मी चुकीचे काही बोललो नाही. तसेच, त्यांच्यावर टीकाही केलेली नाही. माझ्या तोंडी पवारांबद्दल चुकीचा शब्द जाणे कदापि शक्य नाही. तरीही कोणाचा गैरसमज झाला असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत वळसे पाटील यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले. त्यानंतर अजित पवार गटाने ट्विट करत वळसे पाटील यांचे समर्थन केले आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी गैरसमजाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. विधानाबद्दल नाही. विधानावर ते ठाम आहेत. शरद पवारसाहेबांना महाराष्ट्रात एकमुखाने पाठींबा मिळून आजपर्यंत बहुमताने सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामागच्या कारणांची चर्चा आजही अनुत्तरीत आहे, असे राष्ट्रवादीने (अजित पवार गट) आपल्या अधिकृत ट्विटमध्ये म्हटले आहे.

या ट्विटला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडिओ जोडला आहे. त्यात म्हटलेले आहे की, ममता बॅनर्जी यांनी स्वतःच्या बळावर पश्चिम बंगालमध्ये सत्ता आणली. अरविंद केजरीवालांनी दोन राज्यात सत्ता स्थापन केली. नीतिशकुमारांनी बिहारमध्ये वर्चस्व स्थापन केलं आहे. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू, वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांनी स्वबळावर सत्ता आणली.

तेलंगणात के. चंद्रशेखर राव यांनी एकहाती सत्ता स्थापन केली. मात्र, या सर्वांमध्ये शरद पवारसाहेब हे ज्येष्ठ आणि अनुभवी नेते असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या २५ वर्षांच्या इतिहासात पक्षाला महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करता आली नाही, याबाबतची खंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन सोहळ्यात व्यक्त केली होती. आपण याबाबत आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करणार की नाही, अशी विचारणा त्यांनी व्यासपीठावरून केली होती.

दिलगिरी व्यक्त करताना वळसे पाटील म्हणाले होते की, शरद पवार यांच्याबद्दल मी चुकीचे बोललो नाही अथवा टीका केलेली नाही. त्यांनी गेली ३५ ते ४० वर्षे महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली कामगिरी फार मोठी आहे. पण, त्या तुलनेत राज्यातील जनता त्यांच्यामागे ज्या खंबीरपणे उभी राहायला पाहिजे होती. जो पाठिंबा मिळायला पाहिजे होता, तो पाठिंबा मिळालेला नाही, अशी खंत मी बोलून दाखवली होती.

मंचरमध्ये वळसे पाटील काय म्हणाले होते?

शरद पवार यांच्या उंचीइतका नेता देशात नाही, असे आपण म्हणतो. दुसऱ्या बाजूला पवारसाहेबांच्या ताकदीवर किंवा नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील जनतेने त्यांना एकदाही बहुमत दिलं नाही. एकदाही त्यांना स्वतःच्या ताकदीवर मुख्यमंत्री केलं नाही, असे विधान सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंचरच्या मेळाव्यात केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT