Uddhav Thackeray
Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Shivsena : ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? ; मिंधे सरकारच्या खुर्चीखाली धमाका होणार !

सरकारनामा ब्युरो

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर आजच्या 'सामना'च्या अग्रलेखातून निशाणा साधण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीवरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

"सत्ताधाऱ्यांना चांगले दिन आले आहेत, त्यांची दिवाळी चांगली झाली, मात्र जनतेचे काय असा सवाल शिवसेनेकडून उपस्थित केला आहे. तर मिंधे सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही," असा दावाही अग्रलेखात करण्यात आला आहे.

“सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय ? हा प्रश्न कायमच आहे . महागाई , बेरोजगारी , आर्थिक मंदीचे सावट , बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे . अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल , अशी अपेक्षा करणे व्यर्थच आहे”, असे अग्रलेखात नमूद केले आहे.

काय म्हटलं आहे सामनाच्या अग्रलेखात..

‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस का वाढतेय असे एक ना अनेक प्रश्न जनतेच्या मनात धुमसत आहेत. या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही. रोजची आव्हाने व सततच्या धबडग्यातून मनाला उभारी देणारा दिवाळीचा सण सर्वांनाच हवाहवासा वाटतो. मात्र, दिवाळीचा हा सण दणक्यात साजरा होत असतानाच राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर जे ओल्या दुष्काळाचे संकट ओढवले आहे.

सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात, जनतेचे काय?

चिंताक्रांत शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अंधकार दूर कसा करता येईल याचा विचार सरकारने करायला हवा. यंदाच्या पावसाळ्याने सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना पुरते उद्ध्वस्त केले. लाखो हेक्टरवरील पिकांची नासाडी झाली. मूग, उडदापासून आता हातातोंडाशी आलेले सोयाबीन व कापसाचे पीकही ढगफुटीसारख्या पावसाने शेतातच सडत पडले. ऐन दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर अंधार आहे. सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले, हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय? हा प्रश्न कायमच आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT