Shivsena and BJP
Shivsena and BJP  Sarkarnama
मुंबई

शिंदेंच्या बंडामुळे कल्याण-डोंबिवलीत शिवसैनिक म्हणतात, कोणता झेंडा घेऊ हाती

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाने राज्यातील राजकारण ढवळून निघाले असून, ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. राज्यातील या घडामोडींमुळे राज्यात सत्तापालट होणार का? राज्यातील सत्ताबदलांसोबतच ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीत (Kalyan-Dombivali) काय स्थिती राहील यावरुन स्थानिक पदाधिकाऱ्यांत चलबिचल सुरु आहे.

शहरात वरवर भयाण शांतता पसरली असली तरी शाखांमध्ये, पक्षांच्या कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये पुढे काय? याविषयी कुजबूज सुरु झाली आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपाचे भांडण झाले तरी सत्ता स्थापनेवेळी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून हे कार्यकर्ते बसल्याचे दिसून आले आहे. भाजप (BJP) संघनिष्ठांची एक मोठी फळी कल्याण डोंबिवलीत प्रभावी राहीली आहे. राज्याच्या राजकारणात शिवसेना वेगळ्या दिशेने निघाल्यानंतरही शिंदे यांनी कल्याण डोंबिवलीत भाजपा व संघाशी असलेल्या जुन्या मैत्रीचे बंध कायम ठेवल्याचे पहायला मिळाले आहे. आता शिंदे गट वेगळा स्थापन झाल्यास त्यांना भाजपा सोबतच पालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागेल. यामुळे शिंदेंना समर्थन असले तरी कोणत्या झेंड्याखाली आपल्याला निवडणूक लढता येईल. स्थानिक पातळीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी जुळवून घ्यावे लागेल या विचारानेच अनेक शिवसैनिक व्यथित झाले असल्याचे बोलले जात आहे.

राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर आपले कसे होणार? आपण काय भूमिका घ्यायची अशा प्रश्न आजच्या घडीला शिवसेनेच्या गोटातील पदाधिकारी कार्यकर्त्यांना पडला आहे. आगामी पालिका निवडणुका लक्षात घेता इच्छुक उमेदवारांना तर जास्तच चिंता लागून राहिली आहे. शिंदे यांच्या बंडाळीमुळे राज्यात नवीन समीकरणे जुळून भाजप-नवीन शिवसेनेचे सरकार स्थापन झाले तर काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

रामभाऊ म्हाळगी, राम कापसे यांच्यासारख्या नेत्यांच्या माध्यमातून ठाणे, डोंबिवलीत संघ आणि भाजपचा प्रभाव दिसून आला आहे. शिवसेनेची धुरा सांभाळताना शिंदे यांनी संघाशी संबंधित संस्था, कार्यकर्ते यांच्याशी चांगले संबंध कसे राहतील याची काळजी घेतली आहे. भाजपचे नेते-आमदार यांच्याशी सलोख्याचे संबंध कसे राहतील असेच राजकारण शिंदे यांनी केले आहे. शिवसेना भाजपा मैत्री काळात जागा वाटप असो किंवा पालिकेतील सत्तेचा वाटा देताना भाजप फारसा दुखावला जाणार नाही याची देखील त्यांनी काळजी घेतली. भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांच्याशी त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध राहिले आहेत.

भाजप आणि शिंदे यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असले तरी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना भाजप कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली होती. चव्हाण यांच्यासोबत असलेली अनेक नगरसेवक मंडळी शिवसेनेत गेली आहेत. त्यांचा राग स्थानिक पदाधिकारी, आमदारांना आहे. तो राग पालिका निवडणुकीच्या वेळी बाहेर पडला तर आपणास उमेदवारी मिळणे कठीण होईल अशी भिती गयाराम नगरसेवक, कार्यकर्त्यांमध्ये आहे. तर शिंदे गटाचे सरकार आले तर आपण काय करायचे? शिवसेना की शिंदे गटात सामील व्हायचे? कोणत्या झेंड्याखाली निवडणूक लढवायची? शिवसेना पक्षाचे चिन्ह नसेल तर मतदार कसे व्यक्त होतील? असे अनेक प्रश्न पदाधिकाऱ्यांना भेडसावत असून सत्तेत काय बदल होतात याची वाट बघण्यापलिकडे त्यांच्या हाती काही नसल्याचे ते बोलत आहेत.

कल्याणमध्ये शिवसेना नगरसेवकांचे वर्चस्व राहीले आहे. येथील शिवसैनिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पाठींबा दर्शविला आहे. तर काहीजण मात्र अप्रत्यक्षरित्या शिंदे यांना समर्थन करीत आहेत. डोंबिवली हा भाजपचा बालेकिल्ला राहीला असून संघाचा मोठा पगडा येथे आहे. शिंदे गट भाजपासोबत लढल्यास येथे मोठा फटका शिवसैनिकांना बसू शकतो. तर भाजपमधून सेनेत गेलेल्या इच्छुकांचा पत्ता कट होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना आता करायचे काय असा प्रश्न पडला आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील शिवसैनिकांनी देखील तोंडावर बोट ठेवणेच पसंत केले आहे. पक्षप्रमुख ठाकरे यांना अनेकांचे समर्थन असले तरी शिंदे यांच्याविरोधात दुष्मनी नको,अशी भूमिका असल्याने शिवसैनिक शांत असल्याचे बोलले जात आहे.

2014 च्या निवडणूकीत पालकमंत्री शिंदे यांनी कल्याण मधील एका सभेत भाजपकडून शिवसैनिकांवर अन्याय सुरु असून कॅबिनेटमध्ये त्यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. शिवसैनिकांच्या वेदना पहावत नसल्याने पालकमंत्री पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर करत उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा पत्र दिले होते. त्यानंतर आता शिंदे स्वतःच ठाकरे यांना भाजप सोबतच मांडीला मांडी लावून बसण्यास सांगत असल्याने शिवसैनिकांचा एक गट नाराज आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत 2015 च्या निवडणुकीनुसार 122 जागा होत्या. त्यामध्ये शिवसेनेकडे 52 तर भाजपाकडे 42 नगरसेवक आहेत. कॉंग्रेसकडे 4, राष्ट्रवादीचे 2, मनसेचे 9 व एमआयएमकडे 1 व अपक्षांकडे 10 जागा आहेत.

निवडणूकीच्या तोंडावर भाजपच्या 7 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. तसेच सेनेच्या 3 नगरसेवकांचे निधन झाले आहे. भाजपा पुरस्कृत एका अपक्ष नगरसेवकाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आगामी निवडणुका पॅनल पद्धतीने होत असून 133 जागांसाठी ही लढत होणार आहे.

विधानसभा निवडणूकीत मनसेने भाजपला पाठींबा दिला होता. कल्याण ग्रामीणचे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी राज यांच्या आदेशानुसार भाजपला पाठींबा दिल्याचे पाहीले आहे. तसेच स्थानिक पातळीवर विकास कामांवरुन त्यांनी शिवसेनेला खासकरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष करीत आले आहेत. राज्यातील घडामोडींनंतरही ते पालकमंत्री शिंदे यांनाच लक्ष करीत असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून दिसून येत आहे. शिंदे गट भाजप सोबत गेल्यास मनसे काय भूमिका घेते हे पहाणेही औत्सुक्याचे ठरेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT