Shiv Sena
Shiv Sena  sarkarnama
मुंबई

Shiv Sena : मी शिवसेना बोलते ? देखाव्यावर शिंदे सरकारची कारवाई , मंडळाची न्यायालयात धाव

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : शिवसेनेत (Shiv Sena) फूट पडून राज्यात शिंदे सरकार सत्तेत आले. शिवसेना कुणाची? यावर सध्या न्यायालयात वाद सुरु आहे. याचे पडसाद यंदाच्या गणेशोत्सवात उमटत आहे.

कल्याणमधील (Kalyan) एका मंडळाने या विषयावर देखावा सादर करण्याचे नियोजन होते. त्यांची तयारीही पूर्ण झाली होती. पण पोलिसांनी आक्षेप घेत देखाव्यावर आज (बुधवारी) पहाटे कारवाई करत देखावा जप्त केला.

कल्याण मधील विजय तरुण मंडळाचे यंदाचे 59 वे वर्ष आहे. मंडळात बहुतांश शिवसैनिक असून या शिवसैनिकांनी पक्ष निष्ठतेवर गणेश मंडळाचा देखावा साकारला आहे. राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडल्या आहेत. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत भाजपा सोबत राज्यात सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची ही बंडखोरी कट्टर शिवसैनिकांना रुचलेली नाही. कल्याणमध्ये ठाकरे गटाचे शिवसेनेचे महानगर प्रमुख विजय साळवी यांनी शिंदे गटाला प्रखर विरोध पहिल्यापासून आहे.

शिवसेना त्याग आणि शौर्याचा इतिहास आहे..शिवसेना आहे म्हणून नवा इतिहास घडणार आहे. शिवसेना ही कोणाच्या जीवावर आहे तर शिवसैनिकांच्या जीवावर आहे हे दाखविण्याचा प्रयत्न कल्याण मधील विजय तरुण मंडळाने आपल्या गणेशोत्सव देखाव्यातून केला होता.

या कारवाईबाबत विजय तरुण मंडळाचे विश्वस्त विजय साळवी म्हणाले, "यंदाच्या देखाव्यात काहीच आक्षेपार्ह नव्हते. पहाटेच्या सुमारास कारवाई करणे, ही हिटलरशही आहे. आम्ही या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. या कारवाईचा निषेध म्हणून आम्ही यंदा गणेश मूर्तीची स्थापना करणार नाही,"

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी करून भाजपा पक्षासोबत आपला वेगळा संसार थाटून राज्यात सरकार स्थापन केले आहे. ही बाब कट्टर शिवसैनिकांना रुचली नसून आता गणपती मंडळाच्या देखाव्यातून घडलेल्या घटनांवर आधारित चलचित्र देखावे सादर केले जातात. त्या माध्यमातून मंडळाचे म्हणणं मांडलं जातं. आत्ताची सर्वात मोठी घडामोड म्हणजे शिवसेनेत झालेली बंडखोरी, ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही जरी विजय तरुण मंडळाचे विश्वस्थ, कार्यकर्ते असलो तरी आम्ही मूळ शिवसैनिक आहोत. आम्हाला हे रुचलं नाही त्यामुळे ते मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.शिवसेना ही कोणाच्या एकाच्या जीवावर नाही, शिवसैनिकांच्या जीवावर आहे. शिवसेना एक शिवसैनिक काय म्हणतो हे आम्ही या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला असल्याचे साळवी यांनी सांगितलं होत.

दरवर्षी या मंडळाकडून ताज्या घडामोडींवर आधारित देखावा साकारला जातो. आज पहाटेच्या सुमारास पोलीस ताफा आला आणि मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तयार करण्यात आलेला देखावा ही जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांनी सांगितले की ही एक प्रकारे हिटलरशाही आहे. तिचा आम्ही निषेध करतो. मंडळाने काहीही वादग्रस्त दाखवले नव्हते, तर ताज्या विषयावर भाष्य केले होते. तरी देखील देखावा जप्त करण्यात आला आहे .

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT