Nitesh Rane-Deepak Kesarkar sarkarnama
मुंबई

...तर नितेश राणेंचे संचालकपद एका मिनिटात रद्द होऊ शकते

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ स्वीकृत संचालकपदी भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची बिनविरोध निवड झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Nitesh Rane : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तज्ञ स्वीकृत संचालकपदी भाजप (BJP)आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावर शिवसेनेकडून लगेचच प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना (Shivsena) नेते दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी राणेंच्या निवडीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बँकेची थकबाकी असलेला संचालक असू शकतो की नाही ही कायदेशीर बाब आहे. मात्र, राणेंना कायदेशीर बाबींना तोंड द्याव लागणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाबँकेतील त्यांचे विरोधक न्यायालयात गेले तर, त्यांचे संचालक पद एका मिनिटात रद्द होऊ शकते, असे सुचक विधान केसरकर यांनी केले आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाल्या आहे.

केसरकर म्हणाले, "बँकेची थकबाकी असलेला संचालक असू शकतो की नाही हा कायदेशीर मुद्दा आहे. उच्च न्यायालयाने त्यांचे म्हणणे नाकारले होते. मला याबाबत खात्री आहे की, याची नोंद घेतली जाईल. त्यांनी यासाठी मोठा अट्टाहास केला होता आणि संचालक झाले. मात्र, थकबाकी असलेला कुणीही संचालक होऊ शकत नाही. तो थेट निवडून आलेला असो किंवा अप्रत्यक्ष निवडून गेलेला असो तो संचालक होऊच शकत नाही, असा नियम आहे. त्यामुळे पुढे काय होईल हा कायद्याचा प्रश्न आहे. याबाबत मी जास्त बोलणार नाही. ते संचालक झाले असतील तर, त्यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा आहे. आणि जर कायदेशीररित्या ते होऊ शकत नसतील तर, त्यांना ते पद सोडावे लागेल. शिवसेना याबाबत कुठलीही भूमीका घेत नाही. मात्र, त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली ते जर कोर्टात गेले तर, राणेंचे एका मिनिटात संचालक पद रद्द होवू शकते," असा इशारा केसरकरांनी राणेंना दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याचवेळी ही निवड करण्यात आली. तर, दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील शेतकरी व बँक ग्राहकांची प्रगतीसाठी जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालकपदी निवड केली जाते. मात्र, आज जिल्हा बँकेच्या बैठकीत स्वीकृत संचालक या निवडीकरिता तज्ज्ञ स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवत सत्ताधारी संचालक पॅनलकडून नितेश राणेंना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले. ते बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना मतदानाचा देखील अधिकार नव्हता. थकबाकीदार असलेल्या व मतदानाचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत संचालक बनवणे हे बँकेच्या हिताचे नसल्याची टीका सुशांत नाईक यांनी केली आहे.

दरम्यान, भाजप आणि शिवसेना नेत्यांमधील संघर्ष बघता याप्रकरणी राणेंविरोधात विरोधक न्यायालयात जाणार हे निश्चित आहे. नारायण राणे आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. राणेंच्या मुंबईतील अधिश बंगल्याला आज अनधिकृत बांधकाम केल्याच्या तक्रारीवरून मुंबई महापालिकेकडून त्यांना नोटीस देण्यात आली आहे. यावर लगेचच राणेंनीही मातोश्रीवरील चार जणांना व खासदार विनायक राऊतांना ईडीच्या कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे राणे विरूद्ध शिवसेना हा वाद वाढतच जाण्याचे चिन्ह दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT