Aaditya Thackeray Latest Marathi, Uddhav Thackeray News, Varun Sardesai Latest News
Aaditya Thackeray Latest Marathi, Uddhav Thackeray News, Varun Sardesai Latest News Sarkarnama
मुंबई

चर्चांना उधाण; ठाकरे अडचणीत असताना वरुण सरदेसाई वीस दिवसांपासून कुठे आहेत?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर पक्ष फुटीच्या उंबरठ्यावर आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यासह सर्व प्रमुख नेते पक्ष वाचवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पण ठाकरे कुटुंबीयांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे वरुण सरदेसाई मागील वीस दिवसांपासून कुठेच दिसले नाहीत. आदित्य यांची जणू सावली म्हणून वावरणारे वरूण सोशल मीडियातूनही गायब झाले आहेत. त्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत. (Varun Sardesai Latest Marathi News)

पक्षातील बंडानंतर शिवसेना हादरून गेली आहे. बंडखोर आमदारांवर अनेक नेते तुटून पडत आहेत. माध्यमांशी संवाद, व्हिडीओ, ट्विटर, फेसबुकसह विविध माध्यमांतून पक्षाचे नेते, पदाधिकारी बंडखोर आमदारांवर निशाणा साधताना दिसत आहेत. ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली. पण युवा सेनेचा आक्रमक चेहरा असलेले वरुण सरदेसाई मागील वीस दिवसांत ना रस्त्यावर दिसले, ना आदित्य ठाकरेंसोबत. वरुण हे युवा सेनेचे सचिव आहेत.

वरुण हे सोशल मीडियात सतत अॅक्टिव्ह असतात. पण 15 जूननंतर ट्विटर व फेसबुकवर त्यांची एकही पोस्ट नाही. आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची शेवटची पोस्ट आहे. त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत पक्षाच्या दोन आमदारांच्या विजयानंतर साधं अभिनंदनाचं ट्विटही केलेलं नाही. ते मागील काही दिवसांतील राजकीय घडामोडींदरम्यान एकदाही माध्यमांसमोर आलेले नाहीत. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तेही नाराज आहेत की अन्य काही कारणे आहेत, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

कोण आहेत वरूण सरदेसाई?

वरूण हे आदित्य ठाकरे यांचे मावस भाऊ आहेत. ठाकरेंशी असलेल्या कौटुंबिक संबंधांमुळे त्यांचा युवासेनेत कायम दबदबा राहीला आहे. युवासेनेची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे आल्यानंतर पक्षातील सरदेसाई यांचेही वजन वाढत गेले. ते युवासेनेचे सचिव बनले. आदित्य यांच्याकडे मंत्रिपद आल्यानंतर त्यांना युवासेनेच्या कामात मर्यादा येऊ लागल्या. यासाठी वरुण सरदेसाई यांच्याकडे युवा सेनेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी सुरू होती. पण ही नियुक्ती झालीच नाही.

Varun Sardesai Twitter Account

वरूण सरदेसाई अनेक आंदोलनांमध्ये आघाडीवर असतात. त्यांच्याबाबत अनेकदा वादही निर्माण झाले आहेत. सरकारी बैटकांना त्यांची हजेरी वादाचा मुद्दा ठरला होता. त्यामुळे मनसेकडून त्यांचा उल्लेख सरकारी भाचा असा केला जायचा. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्याही निशाण्यावर ते सतत असतात. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काही महिन्यांपूर्वी युवा सेनेची मोट बांधण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरा केला होता. या संपूर्ण दौऱ्यात त्यांचा वावर आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT