Shinde Group Dispute Sarkarnama
मुंबई

Dispute In Shinde Group : रामदास कदमांच्या मुलाची मनमानी वाढली; नाराजी पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना पत्र लिहित घेतला टोकाचा निर्णय...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : गेल्या वर्षी शिवसेना फुटून तिची दोन छकले झाली. त्यातून निर्माण झालेल्या शिंदे शिवसेनेतही सारे काही आलबेल आहे, अशी स्थिती नाही. त्यातही उत्तर मुंबईत माजी मंत्री रामदास कदम यांचा मुलगा सिद्धेश यांच्या मनमानीला कंटाळून शिवसेना पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला असून अनेक जण देण्याच्या तयारीत आहेत. (Shiv Sena office bearer resigns due to Siddesh Kadam's arbitrariness)

कदम (Ramdas Kadam) पिता-पुत्रांनी पूर्वीही शिवसेनेतील माजी मंत्री अनिल कदमसारख्यांना खूप त्रास दिलेला आहे. त्याच्या तक्रारी पक्षप्रमख उद्धव ठाकरेपर्यंत गेल्या होत्या. दरम्यान, ज्या नाराजीतून एकसंध शिवसेना फुटली, तीच आता पुन्हा शिंदे गटाच्या शिवसेनेच्या मुळावर आली आहे. शिवसेनेतील दुफळीनंतर शिंदे (Eknath Shinde) आणि ठाकरे गटात सारे काही आलबेल होईल,असे वाटले होते. पण, वर्षभरातच अपेक्षाभंग झाला. त्यातही उत्तर मुंबईतील मालाड, कांदीवली (पूर्व), चारकोप या तीन विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेनेत प्रचंड नाराजी पसरली आहे. तिला कारण आहे सिद्धेश कदम.

सिद्धेश यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून कांदीवली पूर्व विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे विभागप्रमुख अॅड. विकास गुप्ता यांनी राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या दोन-तीन महिन्यांपासून सिद्धेश यांची या भागात एंट्री झाल्यापासून त्यांचा आम्हाला खूप मानसिक त्रास होत असून त्याला कंटाळून राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

मालाड विधासनभा संघटक नागेश आपटे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले आहे. मालाड आणि कांदीवलीमध्ये काटा काढण्याचे जे प्रकार सुरु आहेत, त्यामुळे माझ्यासारखे सुरूवातीपासून शिवसेनेत काम करणारे पदाधिकारी चिंतेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मालाड, चारकोप, कांदीवली पूर्व या तीनही मतदारसंघातील पदाधिकारी हे सिद्धेश सावंत यांच्या गटबाजी आणि हस्तक्षेपाला कंटाळून सामूहिक राजीनामा देणार असल्याचे चारकोप विधानसभा प्रमुख संजय सावंत यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदेची भेट घेऊन त्यांच्या कानावर हा प्रकार घालणार आहे,असेही ते म्हणाले.

सिद्धेश यांच्या कारनाम्याने त्रस्त झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात महिला पदाधिकाऱ्यांना वरिष्ठांकडून शिवीगाळ आणि त्यांच्या चारित्र्याबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला आहे. पक्षाची वाट लावण्याची जबाबदारी सिद्धेश यांना दिली का, अशी विचारणाही त्यात करण्यात आली आहे. त्यांनी ना शिवसेना विभाग क्रमांक दोनमध्ये कधी सक्रीय भूमिका घेतली नाही,ना कधी मुंबई किवा महाराष्ट्राकरिता भरीव कार्य केले, असा हल्लाबोल त्यात करण्यात आला आहे. त्यामुळे या विभागात पक्षाची स्थिती अतिशय बिकट झाली असल्याचे त्यांनी खेदाने नमूद केले आहे.

पूर्वी चांगल्या सक्रीय कार्यकर्त्यांची पदाधिकारी म्हणून नियुक्ती होत होती. तर, आता गुंड प्रवृतीच्या लोकांना ही पदे देण्यात येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असून चांगले कार्यकर्ते पक्षापासून दुरावत आहेत,हा धोकाही त्यांनी दाखवून दिला आहे. सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये विष पेरण्याचे काम सुरु आहे. म्हणून या सर्व बाबींना कंटाळून आम्ही सर्व पदाधिकारी पदाचा सामुहिक राजीनामा देत असल्याचे या पत्रात शेवटी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT