मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत आघाडी करून सत्ता मिळवणारी शिवसेना उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) स्वबळावर विधानसभेच्या निवडणुकीला (Assembly Election) सामोरे जाणार आहे. उत्तर प्रदेशात शिवसेनेची (Shiv sena) कोणत्याही पक्षासोबत आघाडी नसल्याचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीर केलं. तसेच त्यांनी पुन्हा भाजपला डिवचलं आहे.
देशात पाच राज्यांच्या निवडणुका जाहिर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांनी आपली ताकद दाखवण्यासाठी सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशसह गोवा, मणिपूर, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. शिवसेना गोव्यासह उत्तर प्रदेशच्या रिंगणात उतरणार आहे. गोव्यात राष्ट्रवादी (NCP) व काँग्रेससोबत आघाडी चर्चा सुरू असली तरी अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.
उत्तर प्रदेशातही कोणत्याही पक्षासोबत आघाडी झाली नसल्याचे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. राऊत म्हणाले, उत्तर प्रदेशात शिवसेना कोणत्याही आघाडीत नाही. समाजवादी पक्षासोबत आमचे वैचारिक मतभेद आहेत. पण या राज्यात आम्हालाही बदल हवा आहे. मागील अनेक वर्षांपासून आमचा पक्ष उत्तर प्रदेशात काम करत आहे. पण भाजपला (BJP) दुखवायचे नव्हते, म्हणून निवडणूक लढलो नाही, असं म्हणत राऊतांनी एकप्रकारे भाजपला आव्हानच दिलं आहे.
दरम्यान, शिवसेना गोव्यात (Goa) नऊ जागांवर तर उत्तर-प्रदेशमध्ये 50 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे राऊतांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत उद्यापासून उत्तर-प्रदेश दौऱ्यावर जाणार आहेत. ते गुरूवारी लखनौमध्ये असणार असून शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेणार आहेत. या भेटीत उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी युती करण्यासंदर्भात चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
केवळ उत्तर-प्रदेशच नाही तर संजय राऊत गोव्यात देखील जाणार आहेत. गोव्यात शिवसेनेचे काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेससह आघाडी करण्यासाठी प्रयत्न आहेत. त्या पार्श्वभूमीवर या दौऱ्यात ते 18 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांचीही भेट घेणार आहेत. या भेटीत काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात चर्चा करणार आहेत. काँग्रेससोबत आघाडीचा निर्णय अद्याप न झाल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेना गोव्यात एकत्रित लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र जर गोव्यात काही मनाप्रमाणे घडले नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.