Eknath Shinde Latest Marathi News, Devendra Fadnavis Latest News  Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde: भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रिपदं? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं...

ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आता नव्या सरकारसाठी भाजपकडून तयारी सुरू करण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार कोसळल्यानंतर आता राज्यात नवीन सरकारसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटाच्या मदतीने हे सरकार स्थापन होत असल्याने शिंदे गटातील आमदारांना कोणती मंत्रिपदं मिळणार, याबाबत आतापासून चर्चा सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियात नव्या मंत्र्यांची नावेही व्हायरल होऊ लागली आहेत. (Maharashtra Political Crisis)

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच पुन्हा मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनतील. यांसह गृहखातं, अर्थखातं अशा महत्वाच्या मंत्रिपदांबाबतही सोशल मीडियात चर्चांना उधाण आलं आहे. भाजप आणि शिंदे गटामध्ये मागील काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या, त्यावर आज शिक्कामोर्तब होईल, अशाही चर्चा रंगल्या आहेत.(Eknath Shinde Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांनी मात्र मंत्रिपदांबाबत भाजपसोबत कसलीही चर्चा झाली नसून या अफवा असल्याचा दावा केला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. 'भाजपसोबत (BJP) कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, लवकरच होईल. तोपर्यंत कृपया मंत्रिपदाच्या याद्या आणि याबाबत पसरलेल्या अफवा यावर विश्वास ठेवू नका,' असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

त्याचप्रमाणे शिंदे यांनी यापुढील आपला फोकस काय असेल, याबाबत सुचक ट्विट केलं आहे. 'वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस,' असं शिंदे यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह शिवसेनेतील 39 आमदारांनी बंड केले आहे. त्यामुळे ठाकरे सरकार अल्पमतात आले होते. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी सकाळी बहुमत चाचणीचा आदेश दिला. त्यासाठी गुरूवारी सकाळी अकरा वाजता विशेष अधिवेशनही बोलावण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायालयातही दिलासा न मिळाल्याने मुख्यमंत्री ठाकरेंनी रात्री राजीनामा दिला.

राज्यात शिवसेना (shivsena) आमदारांच्या बंडखोरीने सुरू झालेले राजकीय नाट्य काल (बुधवारी) रात्री संपुष्टात आले. तब्बल साडेतीन तास सुनावणी झाल्यानंतर (30 जून) रोजी बहुमत चाचणी होईल, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. न्यायालयाने फ्लोअर टेस्ट घेण्याच्या राज्यपालांच्या निर्देशाला स्थगिती देण्यास नकार दिला. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी सोशल मीडियावर लाईव्ह येऊन आपल्याच लोकांकडून मिळालेल्या व्यथा मांडल्या आणि मुख्यमंत्रीपद आणि विधान परिषद सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT