Hitendra Thakur | Uddhav Thackeray
Hitendra Thakur | Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

राज्यसभेतील दगाफटका शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी; ठाकूरांकडे केले सपशेल दुर्लक्ष

संदीप पंडित

मुंबई : राज्यसभा निवडणुकीवेळी खासदार राजन विचारे, विनायक राऊत, आमदार सुनिल राऊत अशा शिवसेनेच्या (Shivsena) पहिल्या फळीतील नेत्यांनी बहुजन विकास आघाडीचे (Bahujan Vikas Aaghadi) प्रमुख हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांची भेट घेवून मदत मागितली होती. मात्र निकालानंतर 3 अपक्ष आणि बहुजन विकास आघाडीच्या 3 आमदारांची मत शिवसेनेला मिळाली नाहीत, असे जाहिरपणे सांगून खासदार संजय राऊत यांनी खळबळ उडवून दिली होती. (Vidhan Parishad Election latest news)

परंतु विधानपरिषद निवडणुकीवेळी मात्र शिवसेनेने हा दगाफटका लक्षात ठेवत हितेंद्र ठाकूर यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. विधान परिषद निवडणुकीदरम्यान एक उमेदवार अतिरिक्त असल्याने सर्वच उमेदवारांसाठी एकेक मत महत्वाचे बनले आहे. अशावेळी अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांचे मतही किंमती झाले आहे. ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची 3 मत आहेत.

या 3 मतांच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे भाई जगताप, भाजपचे प्रसाद लाड, राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे हे उमेदवार ठाकूर यांना भेटले. या शिवाय भाजपकडून प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, आमदार मनीषा चौधरी यांनीही स्वतंत्रपणे भेट घेतली. राष्ट्रवादीकडून दीपक साळुंखे हे पण ठाकूर यांच्याकडे जाऊन आले. मात्र शिवसेनेचा एकही नेते ठाकूर यांच्याकडे फिरकला नाही. (Vidhan Parishad Election latest news)

शिवसेना आणि बविआ यांच्यातून वसई-विरार, पालघर या भागामध्ये विस्तवही जात नाही. असे असतानाही शिवसेनेचे आमदार-खासदार राज्यसभा निवडणुकीवेळी ठाकूर यांच्याकडे मदत मागण्यासाठी दोनवेळा आले होते. मात्र त्यानंतर राज्यसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभाव झाला आणि ठाकूर यांनी आपल्यासोबत दगाफटका केला असा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे येत्या काळात शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीमधील हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत.

दुसऱ्या बाजूला राज्यसभेप्रमाणे विधानपरिषद निवडणुकीला शिवसेनेने अधिकचा उमेदवार दिलेला नाही. त्यांनी आपल्याकडे असलेल्या मतांच्या कोटाप्रमाणे दोनच उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे शिवसेनेलाही यावेळी मतांती मदत मागण्याची गरज भासलेली नाही, असे सांगितले जात नाही. याच कारणामुळे यावेळी शिवसनेने हितेंद्र ठाकूर आणि बविआ कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.

मात्र शिवसेनेच्या या दुर्लक्षपणामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे एकनाथ शिंदे हे विधानसभा, महापालिका आणि जिल्हापरिषदेप्रमाणेच हितेंद्र ठाकूर यांना आव्हान देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीत वसई-विरारमध्ये मोठा रणसंग्राम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. संजय राऊत आणि हितेंद्र ठाकूर यांचे जुने संबंध आहेत. त्यामुळे सुरुवातीला राऊत येणाऱ असल्याची चर्चा होती. पण शिवसेनेकडे त्यांचे दोन उमेदवार निवडून येण्यापुरती मते आहेत. त्यामुळे राऊत यांनीही ठाकूर यांच्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT