खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा वाचण्याचा इशारा दिल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. मुंबई पोलिसांना राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्येही मोठा राडा झाला. त्यानंतर पुन्हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला. या सर्व घडामोडींवर दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने निशाणा साधला आहे..
देवेंद्र फडणवीस म्हणतात, आम्ही यापुढे संवाद साधणार नाही, तर संघर्ष करू. लढायला सज्ज व्हा. पण कोणत्या मुद्दय़ांवर ते लढणार आहेत? महागाई, बेरोजगारी, चिनी सैन्याची घुसखोरीसारखे अनेक ज्वलंत विषय आहेत. फडणवीस या विरोधात लढायला तयार असतील तर शिवसेनाच नव्हे देशाचा प्रत्येक नागरिक त्या लढय़ात उतरेल, पण दोन थेंब टोमॅटो सॉससाठी लढण्याची त्यांची भाषा महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्यास काळिमा फासणारी आहे, अशा शब्दांत शिवसेनेने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
तसेच, ''2019 सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाडय़ा’ चित्रपट काढला असता.'' असा खोचक टोलाही शिवसेनेने लगावला आहे.
महाराष्ट्रात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना याबाबत एक सविस्तर पत्र लिहिले याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. फडणवीस यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र भाजप ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही. 2019 सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाडय़ा’ चित्रपट काढला असता.
अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोर्टानेही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. नवनीत राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे फडणवीस यांना तरी शोभत नाही, असेही शिवसेनेने म्हटले आहे.
मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा खार पोलीस स्टेशनातील शाही पाहुणचाराचा व्हिडीओच समोर आणला. त्यामुळे राणांपेक्षा श्री. फडणवीस यांचीच पोलखोल झाली आहे. दुसरे असे की, नवनीत राणा या कधीपासून मागासवर्गीय झाल्या? त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरले आहे. त्यांनी देशाची फसवणूक केली. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई केली. रक्ताऐवजी धमन्यांत टोमॅटो सॉस भरला की, अशा भन्नाट कल्पना एखाद्या राजकीय पक्षाला सुचू शकतात. असा सणसणीत टोलाही शिवसनेने लगावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.