prabhakar sail sarkarnama
मुंबई

'प्रभाकर साईल याचा मनसुख हिरेन झाला का? शिवसेनेचा थेट भाजपवरच आरोप

मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नाप्रमाणेच प्रभाकर साईलचे काय झाले? तो का मेला? असे प्रश्न सगळय़ांना पडले आहेत.

सरकारनामा ब्युरो

मुंबई: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे एक प्रमुख साक्षीदार प्रभाकर साईल (prabhakar sail)यांचा दोन दिवसापूर्वी मुंबईत मृत्यू झाला. प्रभाकर यांचा मृत्यू संशयास्पद झाल्याचे बोललं जाते.

याबाबत गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी चैाकशीचे आदेश दिले आहे. सुरुवातीला प्राथमिक माहिती गोळा केली जाईल आणि मग त्या माहितीच्या आधारे योग्य ती चौकशी करण्यात येईल, असं वळसे पाटील यांनी माध्यमांना सांगितलं आहे. (shivsena directly targeted bjp over prabhakar sails death)

शिवसेनेनं (shivsena)प्रभाकर साईल यांचा मृत्यू संशयास्पदरित्या झाल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'च्या अग्रलेखातून हा आरोप करण्यात आला आहे. प्रभाकर साईल यांच्या मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजप आमनेसामने येण्याची शक्यता नाकारता येत आहे. 'सामना'च्या अग्रलेखातून थेट भाजपवर निशाणा साधला आहे.

एनसीबीचे अधिकारी ज्या भाजप पुढाऱ्यांबरोबर त्या काळात ऊठबस करीत होते, त्यांनी प्रभाकर साईलच्या मृत्यूबाबत समाजमाध्यमांवर व्यक्त केलेल्या भावना रहस्यमय तितक्याच संशयास्पद आहेत. प्रभाकर साईलचा मृत्यू रहस्यमय आहे या संशयास त्यामुळे बळकटीच मिळते. प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय? असे प्रश्न भाजपच्याच गोटातून निर्माण व्हावेत. त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे, असे सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

'प्रभाकरचे काय झाले? त्याचा मनसुख हिरेन झाला काय? असे प्रश्न भाजपच्याच गोटातून निर्माण व्हावेत. त्यामुळे संशयाचा भोवरा जिथे फिरायचा त्याच दिशेने फिरताना दिसत आहे. धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत.' असं अग्रलेखात म्हटलं आहे.

मारुती कांबळेचे काय झाले? या प्रश्नाप्रमाणेच प्रभाकर साईलचे काय झाले? तो का मेला? असे प्रश्न सगळय़ांना पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी नागपुरातून अॅड. सतीश उके यांना 'ईडी'ने एका जमीन घोटाळा प्रकरणात अटक केली. जमीन घोटाळा हे निमित्त आहे. अॅड. उके यांच्या अटकेचे कारण राजकीय दहशत निर्माण करणे हेच आहे.

काय म्हटलं आहे 'सामना'च्या अग्रलेखात

  • प्रभाकर साईल कोण, हे एव्हाना लोकांच्या लक्षात आलेच असेल. शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान याचे कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरण गाजले होते. आर्यनला ड्रग्ज प्रकरणात सरळ सरळ फसविण्यात आले. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाहीत, त्याने ड्रग्जचे सेवन केले नाही.

  • एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी आर्यनला अटक करून सनसनाटी निर्माण केली. याच प्रकरणात खंडणी मागण्याचाही प्रकार घडला. आर्यनला कसे फसवले, एनसीबीचे अधिकारी धनिकांना खोटय़ा प्रकरणांत कसे अडकवत आहेत, याचा पर्दाफाश प्रभाकर साईल याने केला.

  • समीर वानखेडेंचा मुखवटाच या प्रभाकरमुळे फाटला. राष्ट्रवादीचे नेते व मंत्री नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरण कसे बोगस आहे हे टप्प्याटप्प्याने पुराव्यांसह बाहेर काढले. त्यातला एक महत्त्वाचा साक्षीदार प्रभाकर साईल होता.

  • प्रभाकरमुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा बनावटपणा समोर आला. आता अचानक प्रभाकर साईलचा मृत्यू झाला. हा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सांगितले गेले, पण मृत्यू संशयास्पद आहे असे खुद्द गृहमंत्री वळसे-पाटील यांनाच वाटत आहे.

  • भाजपचे लोक पायाखाली चिरडलेल्या मुंगीच्या बाबतीतही शोक संवेदना व्यक्त करून ठाकरे सरकारला जाब विचारतात , पण प्रभाकर साईलच्या संशयास्पद मृत्यूमुळे त्यांना साधी हळहळ वाटू नये याचे आश्चर्य वाटते.

  • धाडसाने जे सत्य बोलत आहेत ते एकतर तुरुंगात ढकलले जात आहेत किंवा प्रभाकर साईलप्रमाणे संशयास्पदरीत्या मरण पत्करत आहेत. महाराष्ट्राच्या गृहखात्याने हे आव्हान स्वीकारायला हवे.

  • अॅड. सतीश उके यांनी गंभीर अपराध, आर्थिक किंवा जमीन घोटाळे केले हे मान्य केले तरी ईडीने पहाटे घुसून त्यांना जेरबंद करण्यासाठी मनी लॉण्डरिंग, हवाला, स्मगलिंगसारखी ती प्रकरणे नव्हती.

  • सतीश उके यांनाही आपल्या जिवाची भीती वाटत आहे. त्यामुळे गृहमंत्री वळसे-पाटील यांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहायलाच हवे. सतीश उके यांना जेरबंद केल्यावर प्रभाकर साईलचा आवाज कायमचा बंद केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT