मुंबई

रामदास कदमांचं चाललंय काय? आधी गावचा सप्ताह अन् आता मणक्याच्या दुखण्याचं कारण

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची आज बीकेसी येथे सभा होत आहे. या सभेला शिवसेनेचे (Shivsena) नेते रामदास कदम (Ramdas Kadam) हे उपस्थित राहणार नाहीत. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीवरून गदारोळ सुरू आहे. सुरवातीला गावातील सप्ताहाचे कारण पुढे करणाऱ्या कदमांना आता ऐनवेळी मणक्याचा दुखणं पुढं केलं आहे. यामुळे कदम हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी या सभेला उपस्थित राहणार नसल्याचं सांगितलं होतं त्यावेळी त्यांनी गावातील सप्ताहाचं कारण पुढं केलं होतं. आज मात्र, कदमांनी वेगळंच कारण पुढे केलं. याबाबत बोलताना कदम म्हणाले की, संजय राऊतांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की रामदासभाईंना सभेचा मेसेज द्या. तसा मेसेज मला मिळाला. पण माझ्या मणक्यात अंतर असल्यानं माझा एक पाय अतिशय दुखतोय. आज पण मी नाईलाजानं उभा होतो. यावर उपचार मी दोन-तीन दिवस ठेवला आहे. दापोडीतील एक जण यावर उपचार करतात. मी एक सांगतो की, भविष्यात उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर कधीच नसेन. उपचार करुन मुंबईला गेल्यावर उद्धव साहेबांना भेटणार. कुणी कितीही अफवा उठवल्या तरी मरेपर्यंत गद्दारीचा डाग लावून घेणार नाही. माझी दोन्ही मुले योगेश आणि सिद्धेश आदित्या ठाकरेंसोबत खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत.

माजी मंत्री रामदास कदम यांनी लिहिलेल्या ‘जागर कदम वंशाचा’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना कदम यांनी सगळ्यात पहिल्यांदा सभेला न जाण्याबद्दल जाहीरपणेे भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, मला उद्धव ठाकरे यांचा निरोप मिळालाय. मला १४ मे रोजीच्या शिवसेनेच्या सभेचे बोलावणं आलं आहे. मात्र, त्या सभेला मी उपस्थित राहणार नाही. त्यानंतर मात्र मी स्वतः उद्धव ठाकरे यांना भेटणार आहे.

गावातल्या देवळात सप्ताहाचा कार्यक्रम असल्याने सभेला येणार नसल्याचा निरोप रामदास कदम यांनी एकनाथ शिंदे यांच्याजवळ दिला होता. आता त्यांनी सभेला हजर न राहण्याचं वेगळं कारण पुढं केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी संबंधित एका ऑडिओ क्लिपमुळे कदम यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे नाराज असल्याचे सांगितले जात होते. त्यातून त्यांना दसरा मेळाव्यासाठी पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले नसल्याचे बोलले जात होते. विशेष म्हणजे कदम यांच्या विधान परिषदेतची मुदत संपल्यानंतर त्यांना पुन्हा संधी देण्याबाबत पक्षाकडून अद्याप विचार झालेला नाही, त्यामुळे नेतृत्व रामदास कदमांवर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT