Eknath Shinde & Subhash Bhoir Latest News
Eknath Shinde & Subhash Bhoir Latest News Sarkarnama
मुंबई

आगरी समाजाच्या मतांसाठी आग्रह धरला तो आता का नाही?; भोईरांनी मुख्यमंत्र्यांना सुनावले...

शर्मिला वाळुंज

डोंबिवली : समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन बाधितांना मोबदला मिळतो. मात्र कल्याण शीळ रोडचे काम सुरु होऊन चार वर्षे उलटली तरी यातील बाधितांना अद्याप मोबदला मिळाला नाही. लोकसभा निवडणुकीत आगरी समाज विरोधात जात असल्याचे जाणवताच आग्रहाने बैठका लावत समाजाची मते आपल्यालाच मिळाली पाहीजे,असा आग्रह तत्कालीन पालकमंत्री व आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरला होता. याची आठवण ठाकरे समर्थक माजी आमदार सुभाष भोईर यांनी भूमिपुत्रांना करुन दिली.

कल्याण शीळ रोड बाधित भूमिपुत्रांना अद्याप मोबदला न मिळाल्याने गेले 45 दिवस भूमिपुत्र धरणे आंदोलनाला बसले आहेत. त्यांना संबोधित करताना भोईरांनी त्यांना आठवण करुन दिली.

लोकसभा निवडणूकीत समाज बांधवाच्या विरोधात जात बांधवांनी शिंदे यांच्या सुपूत्राला मतदान केले. हाच आग्रह याच समाजाच्या भूमिपुत्रांना मोबदला मिळावा यासाठी का केला जात नाही? हे वागणे मुख्यमंत्र्यांना शोभत नाही,असेही भोईर म्हणाले. (Eknath Shinde & Subhash Bhoir Latest News)

कल्याण शीळ रोड रस्ता रुंदीकरणात बाधित झालेल्या पंधरा गावातील ग्रामस्थांना मोबदला न मिळाल्याने गेले 45 दिवसांपासून भूमिपुत्र कल्याण शीळ रोड लगत धरणे आंदोलना करत आहेत. शासनाने अद्यापही याची दखल घेतली नसून दि.बा. पाटील आंदोलन समितीने देखील या भूमिपुत्रांना आपला पाठिंबा दर्शविला आहे.

सरकारला जागे करण्यासाठी बाधित भूमिपुत्र गावागावात घरोघरी जात मोहीम राबवित असून सर्व बाधित भूमिपुत्रांना एकत्र येण्याचा सल्ला देत आहेत. येत्या तीन चार दिवसांत जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर जिल्हाधिकारी यांना त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही, अशी भूमिका या भूमिपुत्रांनी घेतल्याचे पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी सांगितले.

कल्याण शीळ रोडसाठी सुधारीत 561 कोटीचा निधी शासन मंजुर करु शकते परंतू बाधित शेतकऱ्यांना मोबदला मिळावा याची तरदूत करता येत नाही. सरकार कोणाचेही असो इथल्या भूमिपुत्रांच्या जमिनी केवळ प्रकल्पासाठी वापरायच्या आणि त्यांना मोबदल्या पासून वंचित ठेवणे हेच शासनाकडून सुरु आहे.

शासनाचे या भूमिपुत्रांकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व पक्षीय युवा मोर्चाच्या वतीने कल्याण शीळ रोड लगत बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे. गेले 45 दिवस हे आंदोलन सुरु असून शासनाने याची अद्याप दखल घेतलेली नसल्याने भूमिपुत्रांनी आता हे आंदोलन उग्र स्वरुपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दि.बा.पाटील कृती समिती, ठाकरे समर्थक, कॉंग्रेस, राष्ट्रवादी गटांनी या आंदोलनाला पाठींबा दिला असल्याचे दिसते. शुक्रवारी माजी आमदार सुभाष भोईर, पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, संतोष केणे, वंडार पाटील, चंद्रकांत ठाणकर यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावत आंदोलनाला उघड पाठींबा जाहीर केला.

भोईर म्हणाले, गेले 45 दिवस आंदोलन सुरु असूनही सरकारला जाग येत नाही. नेते लोक येतात, पाठींबा दर्शवितात जातात. आत्ताचे मुख्यमंत्री त्यावेळी पालकमंत्री होते, आपल्या जिल्ह्याचे वडील होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला निमंत्रित करत आग्रहाची बैठक बोलावली. त्या बैठकीला जगन्नाथ पाटील सुद्धा होते. आगरी समाज आपल्या विरोधात जात असल्याची भावना शिंदे यांच्या मनात निर्माण झाली होती. त्यावेळी समाजाची मते आपल्यालाच मिळाली पाहीजे,असे आग्रहाने सांगितले होते.

आम्ही आमचे आगरी बांधव बाबाजी पाटील यांना बाजूला ठेवत त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांचे सुपूत्र यांना मतदान केले होते. त्यावेळी पालकमंत्री असलेले शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. त्यावेळी ज्या आग्रहाने मत आपल्याला मिळाली पाहीजे असे सांगितले होते, तोच आग्रह आज भूमिपुत्रांना न्याय देण्यासाठी का करत नाही. खासदारांनी ही जबाबदारी माझी असे सांगत आंदोलन करु नका याचा निर्णय घेतला जाईल, असे भूमिपुत्रांना सांगणे अपेक्षित होते. खासदार, आमदार येथील असल्याने आपले काम सोप्पे होईल असे वाटले होते. मात्र असे काही होताना दिसत नाही.

समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेन हे प्रकल्प सुरु न होता त्यातील बाधितांना मोबदला मिळत आहे. परंतू कल्याण शीळ रोडचे काम सुरु होऊन चार वर्षे उलटली तरी मोबदला मिळत नाही हे वागणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही. मुख्यमंत्री शिंदे यांनी साडे तीन महिन्यात 72 जीआर काढले आहेत. त्यांनी 73 वा जीआर आमच्या भूमिपुत्रांचा प्रश्न निकाली काढून काढावा. गेल्या वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे,असे भोईर यांनी लोकसभा निवडणुकीच्या आठवणी जागवित भूमिपुत्रांचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT