Shiv Sena MLA Disqualification  Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Result: सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंना 'या' चुका भोवल्या...

Sunil Balasaheb Dhumal

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सत्तासंघर्षात शिंदेंनी बाजी मारली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी खरी शिवसेना ही मुख्यमंत्री शिंदेंची असल्याचा निर्वाळा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल फिरवत शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून निवड योग्य असल्याचेही नार्वेकरांनी स्पष्ट केले. यासह ठाकरेंचे प्रतिज्ञापत्र, घटनाही अमान्य असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंच्या काय चुका झाल्या, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

बंडानंतर फ्लोअर टेस्ट टाळली

तत्कालीन शिवसेनेत एकनाथ शिंदेंनी काही आमदारांना घेऊन बंड केल्यानंतर राज्यपालांच्या उपस्थित फ्लोअर टेस्ट दिली नाही. त्यामुळे शिंदेंच्या गोटातील संख्या वाढत गेली. तर सुरुवातीस ठाकरेंसोबत असलेल्या अनेकांनी त्यांची साथ सोडली. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही फ्लोअर टेस्टला सामोरे जाणे गरजेचे होते, असे सांगितले होते.

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

शिंदेंनी बंड केल्यानंतर महाविकास आघाडीच सरकारचे बहुमत कमी झाले होते. यावेळी ठाकरेंनी फ्लोअर टेस्ट टाळली. तसेच तडकाफडकी मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही दिला. यावर सुप्रीम कोर्टानेही बोट ठेवत ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर विचार करता आला असता, असे निरीक्षण नोंदवले. तर शरद पवारांनीही ठाकरेंनी राजीनामा देण्याऐवजी लढायला हवे होते, असे म्हटले होते.

घटना दुरुस्ती नियमबाह्य

शिंदे-ठाकरे सत्तासंघर्षाचा निकाल देताना विधानसभा अध्यक्ष नार्वेकरंनी शिवसेनेची घटना, विधीमंडळ पक्ष आणि पक्षनेतृत्व यांचा आधार घेतला. यावेळी ठाकरेंनी २०१८ मध्ये केलेली घटना दुरुस्तीची तारीख नसल्याचे सांगून ती नियमबाह्य असल्याचे सांगितले. तर शिंदेंच्या शिवसेनेच्या २०२३ मधील घटनादुरुस्ती मान्य असल्याचे स्पष्ट केले. उद्धव ठाकरेंनी २०१८ मध्ये घटना दुरुस्ती केल्यानंतर गटनेत्यामार्फत निवडणूक आयोगाला माहिती दिली नाही. तर तत्कालीन शिवसेना पक्षांतर्गत निवडणूक झाली नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रीय कार्यकारिणीला विश्वासात घेतले नाही

बंड केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पक्षातून हाकालपट्टी केली होती. ही हाकालपट्टी करताना ठाकरेंनी तत्कालीन शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा घेतला नाही. मात्र पक्षाच्या घटनेनुसार पक्षप्रमुख असूनही एकट्या ठाकरेंना कुणावरही कारवाई करता येत नाही. याकडेही नार्वेकरांनी लक्ष वेधत ठाकरेंनी शिंदेंची केलेली हकालपट्टी अमान्य केली.

उलट तपासणीला गैरहजर

सत्तासंघर्षावर वर्षांपासून सुनावणी सुरू आहे. दरम्यान, उशीर होत असल्याने ठाकरे गटाने न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार अध्यक्षांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची उलट तपासणी करणार असल्याचे स्पष्ट केले होते. या उलट तापासणीला उद्धव ठाकरे उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे अध्यक्ष नार्वेकरांनी ठाकरे गटाने सादर केलेले प्रतिज्ञापत्रच अमान्य केले.

Edited by: Mangesh Mahale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT