Pratap Sarnaik, Kangana Ranaut and Arnab Goswami  Sarkarnama
मुंबई

'ईडी'च्या कारवाईमागील कारण शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनीच केलं उघड

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर सक्त वसुली संचालनालयाने कारवाई केली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांना सक्त वसुली संचालनालयाने (ED) दणका दिला आहे. नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेड (NSEL) गैरव्यवहार प्रकरणी सरनाईकांच्या मालमत्तेवर टाच आणण्यात आली आहे. सरनाईक यांचे दोन फ्लॅट आणि एक भूखंड अशी 11.35 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. यावर अखेर सरनाईक यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. याचबरोबर ईडीच्या कारवाईमागील कारणही सरनाईकांनी स्पष्ट केले आहे.

कंगना राणावत आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर हक्कभंग आणल्याने माझ्यावर कारवाई करण्यात आली, असा दावा करून सरनाईक म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात पहिल्यांदा माझ्यावर कारवाई करण्यात आली. माझी न्यायालयीन लढाई सुरु आहे. माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना याबाबत मी माहिती दिली आहे. ते माझ्या पाठीशी उभे आहेत. राज्यातील सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून पहिल्यांदा 24 नोव्हेंबर 2020 रोजी माझ्यावर कारवाई झाली होती. आता 2022 मध्येही ही कारवाई सुरू आहे.

एनएसईएल म्हणजे काय हे मी तपासत आहे. सत्ताधारी पक्षाचा मी आमदार असून, पहिली कारवाई माझ्यावर झाली होती. तेव्हापासून केंद्र आणि राज्य सरकार संघर्ष सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण दिल्यानंतर मी ईडीला सहकार्य केले आहे. ईडीने गेल्या आठवड्यातील हिरानंदानी येथील माझे राहते घर आणि मिरा रोड येथील भूखंड जप्त केला आहे. मला आणि कुटुंबीयांना ईडीने नोटीस पाठवलेली आहे. त्या नोटिशीला मी कायदेशीर उत्तर दिले आहे, असेही सरनाईकांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 30 सप्टेंबर 2013 रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या आधारे ईडीने करचुकवेगिरीची चौकशी सुरू केली होती. या चौकशीत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एनएसईएलच्या सदस्यांनी गुंतवणूकदारांकडून गोळा केलेले पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवले आणि कर्ज फेडण्यासाठीही वापरले, असे चौकशीत समोर आले होते. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये एनएसईएलचे महत्वाचे अधिकारी आणि 26 कर्जबुडव्यांचा समावेश होता. त्यांनी 13 हजार गुंतवणूकदारांना 5 हजार 600 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे.

आस्था ग्रुपने एनएसईएलकडून 242.66 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. आस्था ग्रुपने यातील 21.74 कोटी रुपये विहंग आस्था हाऊसिंग प्रोजेक्ट्स एलएलपी कंपनीत वळवले. या कंपनीला मिळालेल्या रकमेपैकी 11.35 कोटी रुपये विहंग एंटरप्रायझेस आणि या विहंग इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांत वळवण्यात आले. या दोन्ही कंपन्या प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या आहेत. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत 3 हजार 242 कोटी रुपयांची मालमत्ता आधी जप्त केली होती. आता एकूण जप्त मालमत्तेचे मूल्य 3 हजार 254 कोटी रुपयांवर गेले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT