Maharashtra Politics: राज्यात विधानसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते. एकदा तारखा जाहीर झाल्या की प्रत्येक पक्ष जोमाने कामाला लागतो. आजचे चित्र वेगळे आहे. सगळेच आघाडीवाले, महायुतीवाले आणि इतर छोटे-मोठे पक्षही खऱ्या अर्थाने कामाला लागले आहेत. राज्यात चित्र-विचित्र आघाड्या होतील.
कोण कोणत्या पक्षात जाईल आणि कोणता झेंडा हातात घेतील हेही सांगता येत नाही. काही असले तरी महायुतीत शिंदेची शिवसेना आणि महाआघाडीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अधिक हवा आहे. महायुतीत एकनाथ शिंदे जोरात आहेत. ते त्यांच्या शिलेदारांच्या मागे नेहमीच खंबीरपणे उभे असतात. कोणी चुकला तरी त्याला जाब विचारतील. पण, वेळ आली की मात्र शिंदे अशांची पाठराखण करतात.
आज-कालच्या राजकारणात वाचाळवीरांची काही कमतरता नाही. नेते काय बोलतात? कोणते शब्द वापरतात याची तर काही बोलायची सोयच नाही. सर्वच पक्षात वाचाळवीरांचे पिक आले आहे. शिंदेच्या शिवसेनेतही तसे महाशय आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात आरक्षणासंदर्भात जे वक्तव्य केले, त्या संदर्भात आमदार संजय गायकवाड यांनी जी मुक्ताफळे उधळली, त्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. राहुल यांची जीभ छाटणाऱ्यासह म्हणे ११ लाख देऊ. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानं राज्यात पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले. आपण काय बोलतो आहोत. कोणाविषयी बोलतो आहोत याचे भानही राहिले नाही.
अगदी पक्षीय मतभेद टोकाचे असतात. प्रत्येक पक्ष आपले आदर्श जपत राजकारणही करीत असतो. म्हणून समाजमाध्यमांमुळे आज काहीही बोलले तर त्याला तत्काळ प्रसिद्धी मिळते. प्रक्षोभक भाषणे आणि वादग्रस्त विधानाला नको तितके अवास्तव महत्त्व दिले जात आहे. त्यामुळेच वाचाळवीरांचे फावते. एकीकडे एकनाथ शिंदे एक कणखर नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत. तर दुसरीकडे वाचाळवीरांची बाजू घेतानाही दिसतात. राहुल गांधी चूक की बरोबर हा मुद्दा बाजूला ठेवला तरी ते विरोधी पक्षनेते आहेत. ते नेमके काय म्हणाले याचा विचार न करता थेट जीभ छाटण्याची भाषा म्हणूनच समर्थनीय ठरू शकत नाही. आता तर खुद्द शिंदे हे गायकवाडांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहे. शिवसेनाच काय कोणताही पक्ष वाचाळवीरांच्या मागे उभा राहतो. भाजप नेते नीतेश राणे यांच्याविषयी तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच भाजपच्या श्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.
आगामी काळात जसजसा निवडणुकीला रंग चढेल तसतसा भाषेचा स्तर खालावत जाईल. या सर्व घटनांकडे पाहिले तर असं लक्षात येतं, काही करून प्रत्येकाला आपले उमेदवार निवडून आणायचे आहेत. तो उमेदवार आणि त्याची पार्श्वभूमी कोण लक्षात घेणार आहे. म्हणजेच प्रत्येक पक्ष वाचाळवीरांकडे कानाडोळा करणार हे आलेच. एकीकडे शिंदे स्वत:ची प्रतिमा ज्या पद्धतीने जपत आहेत, त्याचे जनता स्वागत करीत असते. पण मध्येच असे काही तरी होते की हे शिंदे तेच का? असे म्हणण्याची वेळ येते. आमदार गायकवाडांचे ज्या पद्धतीने त्यांनी समर्थन केले त्यावरून एक गोष्ट लक्षात येते की शिवसेनेला एक एक आमदार निवडून आणायचा आहे.
आज महाराष्ट्राच्या राजकारणावर देशात चर्चा होत आहे. महायुतीची सत्ता जाणार असे समाजवादी पक्षाचे नेते, खासदार अखिलेश यादवही म्हणू लागले आहे. तर दुसरीकडे ‘महायुतीच सत्तेवर येणार’ असा छातीठोक दावा महायुतीवाले करीत आहेत. पण, मुख्यमंत्री कोण हे सांगत नाही. फक्त शिवसेना म्हणते की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री होणार म्हणून. दुसरीकडे काँग्रेसलाही वाटते की मुख्यमंत्री आमच्याच पक्षाचा होणार. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस तसा दावा करीत नसले तरी ‘ज्याच्या अधिक जागा त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल’ असे सांगत आहेत.
एकनाथ शिंदे हे कोणताही सण, उत्सव असो त्याचे ‘ब्रॅडिंग’ करण्यात कुठेच मागे पडत नाहीत. घरच्या गणपतीच्या सोहळ्यात नातवाला खांद्यावर घेणे असेल किंवा शेतकऱ्यांच्या मुलांकडून आरती करणे असेल किंवा आमदार-कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहाणे असेल. वारंवार दिल्लीला कशासाठी जातात, या विरोधकांच्या आक्षेपाला उत्तर देताना ते सांगतात, की मी निधीसाठी दिल्लीला जातो. योजना आणतो. राहुल गांधी यांचा समाचारही ते घेतात. सूर्य, चंद्र असेपर्यंत आरक्षण कायम राहील, तसेच ‘सावित्रीच्या लेकी’ विरोधकांना धडा शिकवतील म्हणजेच ‘लाडकी बहीण योजना’ लाभ मिळवून देईल असे त्यांना वाटते आहे. शिवसेनेचा झंझावत कायम राहण्यासाठी शिंदे संधी सोडत नाहीत, हे खरे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.