Poonam Mahajan, Sanjay Raut sarkarnama
मुंबई

युती तोडणाऱ्या भाजपच्या त्या नेत्यांना पूनम महाजन नामर्द म्हणणार का?

दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती 2014 साली ज्यांनी तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामा ब्युरो

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या भाषणाचे पडसाद भाजपमध्ये उमटले. हिंदुत्वाच्या मुद्यांवरुन ठाकरेंनी भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला होता. भाजपच्या नेत्यांनी त्याला प्रत्युत्तर दिलं होत. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टि्वट करीत भाजपवर निशाणा साधला होता. त्याला भाजपचे नेते पूनम महाजन (Poonam Mahajan) यांनी टि्वट करुन प्रत्युत्तर दिलं होते.

राऊतांच्या या ट्विटवर पूनम महाजन चांगल्याचं संतापल्या. त्यांनी राऊतांना खणखणीत शब्दांत प्रत्युत्तर दिलं. 'स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी, या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दांसारखे कार्टून दाखवू नका,' असं या ट्विटमध्ये महाजन यांनी म्हटलं. आजच्या 'रोखठोक'मधून राऊतांनी त्याचा समाचार घेतला आहे.

''नरेंद्र मोदी, अमित शहा नव्हते तेव्हा प्रमोद महाजन हे एकमेव नेते होते. त्यांना उद्योग जगतात मुक्त प्रवेश होता व महाजन यांच्यामार्फतच पक्षाला निधी मिळत असे. बाळासाहेब ठाकरेंशी त्यांचे उत्तम संबंध असले तरी बाळासाहेब जाहीरपणे भाजपचा उल्लेख 'कमळी' असा करून खिल्ली उडवत. तरीही दोन पक्षांत कधी कटुता आली नव्हती. जागा वाटपात ठरल्याप्रमाणे शिवसेनेचाच वरचष्मा असे. तरीही प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या जागा वाटाघाटी व घासाघीस करून वाढत गेल्या.

आर. के. लक्ष्मण यांनी त्या काळातल्या वस्तुस्थितीचे वर्णन करणारे एक व्यंगचित्र रेखाटले होते. त्यात बाळासाहेब त्यांच्या खुर्चीवर बसले असून समोरच्या खुर्चीवर त्यांनी पाय ठेवले आहेत. समोर भाजपचे प्रमुख नेते जागा वाटपाची फाइल घेऊन उभे आहेत. पाहुण्यांसाठी असलेल्या खुर्चीवर पाय ठेवून बाळासाहेब म्हणतात, 'या, बसा.' बाजूला एक छोटासा स्टूल दिलाय इतकेच. या चित्राकडे व्यंग म्हणून पाहायला हवे. पण तेव्हा वस्तुस्थिती हीच होती,'' असे राऊतांनी नमूद केले होते.

''हे चित्र मी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करताच पूनम महाजन चिडल्या व म्हणाल्या, 'स्वर्गीय बाळासाहेब व स्वर्गीय प्रमोदजी या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी युती केली होती. नामर्दासारखे कार्टून दाखवू नका.' पूनम महाजन या स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या. त्यांच्या भावना मी समजू शकतो, पण दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती 2014 साली ज्यांनी तोडली त्या भाजपच्या नेत्यांना पूनम महाजन आता नामर्द म्हणणार काय? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे.

''महाराष्ट्रात मुंडे-महाजन-खडसे यांनी भाजप वाढवला. विदर्भात गडकरी होते. भाऊसाहेब फुंडकर, महादेव शिवणकरांचेही योगदान होते. आज त्यांचे नामोनिशाण नाही. जेथे आडवाणीच उरले नाहीत, तेथे इतरांचे काय? पंकजा मुंडे या जाहीरपणे पक्षांतर्गत बाबींविषयी नाराजी व्यक्त करतात. पूनम महाजन खासदार आहेत. महाराष्ट्रात काल बाहेरच्या पक्षातून आलेल्यांना केंद्रात मंत्रीपदे मिळाली, पण प्रमोद महाजन यांच्या कन्येस मंत्रीपद मिळाले नाही. गोव्यात एकाच कुटुंबातील अनेकांना उमेदवाऱ्यांची खिरापत दिली, पण मनोहर पर्रीकरांचे पुत्र उत्पल यांना उमेदवारी नाकारताना घराणेशाही चालणार नाही, असे ठणकावले गेले. हे सर्व राजकारण कोणासाठी सुरू आहे,''असे राऊत म्हणाले.

''भारतीय जनता पक्षात मोदी-शहांचा उदय होताच शिवसेना नकोशी व्हावी याचे रहस्य काय? पूनम महाजन म्हणतात त्याप्रमाणे, महाजन-ठाकरे या दोन मर्दांनी हिंदुत्वासाठी केलेली युती 2014 साली तुटली. तेव्हाच मर्दानगीच्या मुद्द्यावर प्रमोद महाजन यांच्या कन्येने निर्भयपणे तोंड उघडायला हवे होते. शिवसेनेकडून युती तुटावी असे कोणतेच अघोरी प्रयोग झाले नाहीत. हिंदुत्ववादी शिवसेनेचे महत्त्व कमी करायचे व अधिकार संपवायचे हे धोरण राबवणारेच भाजपचे आज सूत्रधार आहेत. महाराष्ट्रातील सत्ता त्यांनी गमावली आहे. पण राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांचा गोळीबार सुरू आहे. आता त्यांना मुंबईवर कब्जा मिळवायचा आहे. म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीचा सौदा करायला ते मोकळे झाले,'' असा टोला राऊतांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT