Vinayak Raut News, Uddhav Thackeray News, Rajya sabha election 2022 latest news
Vinayak Raut News, Uddhav Thackeray News, Rajya sabha election 2022 latest news Sarkarnama
मुंबई

राज्यसभेचा तिढा! मुख्यमंत्री ठाकरेंनी खासदार राऊतांवर सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यात राज्यसभा (Rajya sabha) निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) आमदारांचा मुक्काम हॉटेलमध्ये असणार आहे. यानंतर आज शिवसेनेने आमदारांना आदेश काढला आहे. आमदारांना बॅगा भरून मुंबईत वर्षा निवासस्थानी येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आमदारांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्यावर सोपवण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Rajya sabha election 2022 latest news)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांसह अपक्ष आमदारांची आज बैठक घेणार आहेत. यासाठी शिवसेनेने आमदारांना आज आदेश बजावला आहे. त्यांना बॅगा भरून मुंबईत दाखल होण्याचा आदेश देण्यात आला आहे. या आमदारांना वर्षा निवासस्थानी हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. तेथे आमदारांना मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे. तेथून त्यांची थेट हॉटेलवर रवानगी करण्यात येईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक उद्या (ता.7) मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर होणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत सहाव्या जागेवर उमेदवार देऊन तो निवडून आणण्यावर शिवसेना आणि भाजप अखेर ठाम राहिले आणि आपापले उमेदवार रिंगणात ठेवले आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजप नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या; तरीही भाजपने आपली भूमिका कायम ठेवली. त्यामुळे ही निवडणूक होच आहे. मात्र, गेल्या अडीच पावणेतीन वर्षापासून ठाकरे सरकारला पाडण्याच्या इरादा केलेल्या भाजपकडून या निवडणुकीत आमदार फोडले जाऊ शकतात, अशी भीती शिवसेनेला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या काळात आपले आमदार हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. त्यानुसार ८ ते १० जून असे तीन दिवस आमदारांना मुंबईत बोलाविण्यात आले आहे. सुरवातीला त्यांच्या राहण्याची व्यवस्था हॉटेल ट्रायडंटमध्ये करण्यात आली होती. त्यासाठीचे बुकिंगही करण्यात आले होते. मात्र, याच हॉटेलमध्ये भाजपचे आमदार राहणार असल्याची बातमी ठाकरेंच्या कानावर आली. त्यातून सावध झालेल्या शिवसेनेच्या इतर नेत्यांनी बैठका घेत व्यूहरचना बदलली. त्यानंतर आमदारांना मडमधील हॉटेलमध्ये ठेवण्याच्या दृष्टीने तयारी झाली.

राज्यसभेच्या सहाव्या जागेवर आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी शिवसेना आणि भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या जागेवर शिवसेनेने संजय पवार यांना रिंगणात उतरविल्यानंतर भाजनेही माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली. मात्र निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने शिवसेनेचे खासदार अनिल देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, काँग्रेस नेते सुनील केदार यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर जाऊन भेट घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीत मदत करण्याची शब्द देत, राज्यसभेच्या निवडणुकीतून आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती या नेत्यांनी फडणवीस यांना केली. मात्र, या वाटाघाटी यशस्वी होऊ शकल्या नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT