Thackeray Vs Shinde: Sarkarnama
मुंबई

ShivSena News: शिवसेनेच्या शाखा कुणाच्या ? दिघेंनी सुरू केलेल्या शाखेवर शिंदे गटाचा ताबा

Thackeray Vs Shinde: आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mangesh Mahale

Thane : शिवसेनेत फूट पडल्यानंतर शाखा ताब्यात घेण्यावरून मुंबईत सध्या दोन्ही गटांत वाद चिघळला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाणे आणि मुंबई परिसरातील शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांत राडा होत आहे.

आता पुन्हा एकदा मुंब्रा येथील शाखा ताब्यात घेण्यावरून ठाकरे-शिंदे गटांमध्ये पुन्हा एकदा वाद पेटला आहे. ठाकरे गटाच्या कार्यालयावर शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ताबा घेतला आहे. ही शाखा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी सुरू केली होती. आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदेंनी ठाण्यातील शाखांवर लक्ष केंद्रित केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आनंद दिघे शाखांना आपलं घर मानायचे...

आनंद दिघे नेहमीच शिवसेना शाखांना आपलं घर मानायचे आणि या घरांमध्ये आलेल्या जनतेला न्याय मिळाला पाहिजे, असे ते म्हणायचे. यामुळे ही शाखा कोणाच्या मालकीची नाही तर ही शाखा सर्वसामान्य शिवसैनिकांची आहे, पण शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर शाखांवर दोन्ही गटांकडून दावा करण्यात येत आहे. न्यायालयीन लढाईत शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाकडे आल्याने शाखांवरही शिंदे गटाने मालकी सांगण्यास सुरुवात केली आहे. पण शाखा कुणाच्या मालकीच्या असतील, यावर न्यायालयाने स्पष्ट मत व्यक्त केलेले नाही.

दोन्ही गटांत चढाओढ सुरू

बहुतांश शाखांची कार्यालये ही ठाकरे गटाकडे आहेत. ही कार्यालये ताब्यात घेण्यासाठी शिंदे गटानं दंड थोपटले आहे. शिवसेनेचा विस्तार अशाच शाखांमधून झाला आहे. मराठी माणसांचा प्रश्न सोडविण्यासाठी शाखा कार्यालये महत्त्वाची ठरली आहेत. नगरसेवक, शाखाप्रमुखांकडे शाखा कार्यालयात तक्रारी, आपले प्रश्न घेऊन अनेक नागरिक येत असतात. त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शिवसैनिकांकडून होत असतो. शिवसेनेतील फुटीनंतर या शाखांवर कोणाचं वर्चस्व अधिक, यासाठी दोन्ही गटांत चढाओढ सुरू असल्याचे चित्र आहे.

शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून विविध शाखांमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाखा ताब्यात घेण्यावरून दोन्ही गटांत तणावाचं वातावरण निर्माण होत असल्याने प्रत्येक शाखेबाहेर पोलिसांनी सुरक्षा द्यावी आणि पोलिस तैनात करावेत, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

शिंदे गटाकडून बळाचा वापर ...

पोलिस आणि सत्तेच्या बळावर शिंदे गट शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोक्याच्या जागी असलेले शिवसेना शाखेचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी दोन्ही गटांनी चंग बांधला आहे. आगामी काळात हा वाद अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT