Ashok Chavan devendra fadnavis narendra modi uddhav thackeray Sarkarnama
मुंबई

Shivsena News : "...अन् हीच भाजपच्या पराभवाची गॅरंटी", चव्हाणांच्या प्रवेशावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल

Thackeray Group On Bjp : "भाजप रोज इतर पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या 'वॉशिंग मशीन'मध्ये टाकून स्वच्छ करीत आहे," अशी टीकाही ठाकरे गटानं केली आहे.

Akshay Sabale

'आदर्श'मध्ये शहिदांचा अपमान झाला म्हणून काँगेसच्या चव्हाणांना घरी पाठवा, आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू, अशी 'गॅरंटी' मोदी यांनी नांदेडला येऊन दिली होती. अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) हे लीडर नसून डीलर आहेत, असे देवेंद्र फडणवीस गळ्याच्या नसा फाडून बोंबलत होते. आज त्याच डीलरच्या, शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटविण्याचे काम फडणवीस-मोदी यांना करावे लागत आहे. भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे! शहीद भाजपला माफ करणार नाहीत, अशी टीका शिवसेनेनं ( ठाकरे गट ) 'सामना' अग्रलेखातून केली आहे. ( Thackeray Group Attacks Narendra Modi And Devendra Fadnavis )

"महाराष्ट्रातच नाही, तर असे वातावरण संपूर्ण देशातच तयार झाले आहे. 'अब की बार चारसौ पार' ही मोदी गर्जनाही याच मोहिमेचा एक भाग आहे. अर्थात, भारतीय जनता पक्षाची ( Bjp ) 400 जागांची दिल्ली अभी बहोत दूर है. इतर पक्षांतील शक्तिमान भ्रष्टाचाऱ्यांना घेऊन देखील ते जेमतेम दोनशेचा आकडा पार करू शकतील, असे वातावरण आहे. याच घाबरलेल्या अवस्थेत भाजप रोज इतर पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या 'वॉशिंग मशीन'मध्ये टाकून स्वच्छ करीत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते भाजप वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत. पाप धुण्यासाठी पूर्वी गंगास्नान करण्याची परंपरा होती. आता भाजप वॉशिंग मशीन हीच गंगोत्री झाली आहे," असा हल्लाबोल ठाकरे गटानं केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"संसदेच्या अधिवेशनात 'यूपीए' काळातील आर्थिक घोटाळ्यांवर मोदी सरकारने एक श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेत अशोक चव्हाण यांच्या 'आदर्श घोटाळ्याचा खास उल्लेख आहे. दोन दिवसांपूर्वी श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली, काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि मंगळवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता बहुधा ते भाजपचे राज्यसभेचे उमेदवार असतील, पण 'आदर्श' घोटाळ्यात जो शहिदांचा अपमान झाला त्याचे काय? मग ज्या शहिदांसाठी भाजपने अपमान झाल्याची बोंब ठोकली ती खोटी होती? की शहिदांनाच भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्यावरील हौतात्म्याचे रंग पुसून टाकले? ते शहीद नव्हतेच असे आता भाजप जाहीर करणार असेल तर प्रश्नच संपला," असं टीकास्रही ठाकरे गटानं सोडलं आहे.

"अजित पवार यांच्या 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची तुतारी स्वत: मोदी यांनी फुकली व पुढच्या चोवीस तासांत 'काका'च्या पाठीत खंजीर खुपसून अजित पवार सिंचन घोटाळ्यासह भाजपसोबत सत्तेचे भागीदार बनले. आता अशोक चव्हाण गेले, अशा तऱ्हेने भाजपची काँगेस झाली असून एक विचारधारा असलेला भारतीय जनता पक्ष मोदी-शहांनी मोडून संपवून टाकला. देशातून काँगेस संपविण्याचा नारा मोदी देत होते. मात्र, त्यांनी भाजपचीच 'काँग्रेस' केली आणि काँग्रेसला अमर करून ठेवले. काँग्रेसशिवाय भाजप व देश चालू शकत नाही हे मोदींनी सिद्ध केले. 'ईडी' सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप इतर पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना स्वपक्षात घेत आहे. भाजपकडे स्वत:चे असे काहीच उरलेले नाही. त्यामुळे ही उधार-उसनवारी त्यांनी सुरू केली. भ्रष्टाचार संपवून काळा पैसा नष्ट करण्याचे मोदींचे वचन होते, पण देशभरातील सर्वपक्षीय भ्रष्टाचाऱ्यांची 'टोळी' म्हणून आता लोक भाजपची चेष्टा करीत आहेत," असा टोलाही ठाकरे गटानं लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT