Shivsena vs Shinde group|
Shivsena vs Shinde group| 
मुंबई

अविश्वासापुढे निष्ठा हरली; ठाणे जिल्हा प्रमुखाने सोडली ठाकरेंची साथ

सरकारनामा ब्युरो

हेमलता वाडकर

ठाणे : ठाणे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेनेला (Shivsena) मोठा धक्का बसला आहे. मरेपर्यंत शिवसेनेची साथ सोडणार नाही आणि धनुष्य बाणाशिवाय दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवणार नाही, असे आईला वचन दिलेल्या शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख प्रकाश पाटील यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला. पक्षाने दाखवलेला अविश्वास, संशय आणि अपमानास्पद वागणुक याला त्रासलेल्या प्रकाश पाटील यांनी एक महिना आधीच शिवसेना सोडली, पण त्याची साधी दखलही पक्ष नेतृत्ववाने घेतली नाही. अशी खंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेना पक्षप्रमुखांभोवती असलेल्या गोतावळ्याने आपल्याला ही संधीच मिळू दिली नाही. त्यामुळे राजकीय भवितव्यासाठी मातोश्रीच्या बंद दरवाज्यात जाण्यापेक्षा शिंदे गटाच्या खुल्या दरवाज्यात जाणे पाटील यांनी पसंत केले. याचे परिणाम भविष्यात काय होतील हे येणारा काळच दाखवेल, पण तुर्तास शिवसेनेने ठाणे ग्रामीण भागात भक्कम पकड असलेला मावळा गमावला आहे.

ठाणे जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. एकनाथ शिंदे यांची जिल्ह्यावर चांगलीच पकड आहे. पण असे असले तरी ग्रामीण भागात प्रकाश पाटील यांचा मोठा दबदबा होता. शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी तळागाळात पोहचवलेली शिवसेना वाढवण्याचे काम प्रकाश पाटील यांनी केले. ठाणे जिल्हा परिषद असो वा ग्रामपंचायत निवडणुका सर्व जबाबदारी प्रकाश पाटील यांच्याकडेच असायची. इतकेच नव्हे तर भिवंडी, उल्हासनगर, बदलापूर, शहापूर, मुरबाड या भागातही त्यांचा शब्द शिवसैनिकच नव्हे तर इतर पक्षातील नेतेही पाळायचे. त्यामुळे पाटील त्यांची नियुक्त शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुखपदी करण्यात आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानत असल्याने शिवसेनेला कधीच सोडणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती. पण आज त्यांनी ही शपथ मोडली आहे.

खरेतर शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गटात येण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाली होती. साम दाम दंड सर्व प्रकारे हे प्रयत्न सुरू होते. त्यात बऱ्यापैकी शिंदे गटाला यशही आले. पण प्रकाश पाटलांसारखा कट्टर शिवसैनिक गळाला लागत नव्हता. पण यासर्व घडामोडीत पडद्याच्या दुसऱ्या बाजुला मात्र वेगळेलच नाट्य रंगले होते. त्याला निमित्त ठरले होते, आमदार शांताराम मोरे यांचे.

भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे हे कधी काळी प्रकाश पाटील यांचे वाहन चालक होते.  भिवंडी ग्रामीणचा मतदारसंघ आरक्षित झाल्याने पाटील यांची उमेदवारी हुकली. पण त्यांनी आपल्या वाहनचालकाला आमदार म्हणून निवडणू आणला. तेही सलग दोनवेळा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या बंडामध्ये प्रकाश पाटीलही सहभागी असून ते केवळ शिवसेनेचा अंदाज घेण्यासाठी पक्षात आहेत अशी वावटळ उठली. त्यामुळे संशयाचे धुके अधिक गडद होत गेले.  त्यातच एकेकाळी त्यांच्या हाताखाली काम केलेल्या पदाधिकाऱ्यांना नेते, उपनेतेपदावर नियुक्ती झाली. हा घाव प्रकाश पाटील यांच्या जिव्हारी लागला.

तीन महिने वाट पाहिली

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही  त्यांच्या विरोधात ग्रामीण भाग पेटवून आणला. याची दखल न घेता काही लोकांच्या बोलण्यावरून पक्ष श्रेष्ठींनी आपल्या निष्ठेची किंमत केली हा घाव बोचत होता. तरीही तीन महिने वाट पाहिली. पण आता सहनशक्ती संपल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांना समर्थन देत असल्याचे प्रकाश पाटील यांनी सांगितले.

निर्णय घेणे सोपे नव्हते

शिंदे यांना समर्थन देण्याआधी शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्याशी चर्चा झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची एकदा भेट घेऊन निर्णय घेण्याचे ठरवले होते. ठाकरेंच्या मनातही आपल्याविषयी प्रेम आहे हे माहित आहे. पण त्यांच्या भोवती असलेले काही तीन चार लोकांमुळे आपली ही भेटही वाया जाणार असे वाटले.

पक्ष संघटनेसाठी उपयोग होईल

प्रकाश पाटील हे गेली १२ वर्षे शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुखपदी कार्यरत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अग्रगण्य गोपीनाथ पाटील पारसिक बँकेच्या उपाध्यक्षपदी देखील ते कार्यरत आहेत. त्यांचे संघटन कौशल्य आणि ग्रामीण भागात असलेली मजबूत पकडचा पक्ष संघटनेसाठी उपयोग होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT