Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

भाजपच्या हुकूमाच्या पत्त्यांना शिवसेनेचे प्रत्यूत्तर; "आमची आकडे आणि मोड दोन्हीची तयारी!"

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या चर्चांनी सध्या राजकीय वर्तुळात जोर पकडला आहे. निवडणूक घोषित झालेल्या ६ जागांपैकी ५ जागांवर भाजपचे २, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. त्यामुळे ६ व्या जागेसाठी चुरस निर्माण झाली आहे. यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje) यांनी आपली स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र अद्याप कोणत्याच राजकीय पक्षाने आपला पाठिंबा त्यांना जाहीर केलेला नाही.

अशात शिवसेनेने देखील काल ६ वी जागा लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा असणार नाही, हे स्पष्ट आहे. त्यातच दोन जागा हमखास निवडून येऊ शकणाऱ्या भाजपने देखील तिसऱ्या जागेसाठी हुकूमाचे पत्ते काढण्याची रणनीती आखली आहे. यासाठी पियूष गोयल, (Piyush Goyal) विनोद तावडे, (Vinod Tawde) हर्षवर्धन पाटील, (Harshwardhan Patil) धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या नावाची चर्चा सध्या चर्चा सुरू आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला १३ मते कमी पडतात.

या सगळ्या संभाव्य घोडेबाजारावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी यातून एकप्रकारे भाजपला इशारा दिला आहे. ते म्हणाले, राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय. भ्रष्टाचारातून पैसा, त्यातून घोडेबाजार! हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे.

सध्या भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. यात भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत. यात दोन उमेदवार सहज निवडून येवू शकतात.

तर महाविकास आघाडीकडे १६९ आमदारांचे संख्याबळ आहे. यात शिवसेना ५६, राष्ट्रवादी काँग्रेस ५३, काँग्रेस ४४, बहुजन विकास आघाडी ३, समाजवादी पक्ष २, प्रहार १, स्वाभिमानी शेतकरी संघटना १, शेकाप १, अपक्ष ८ अशा आमदारांचा समावेश आहे. या संख्याबळानुसार शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांचा प्रत्येकी १ खासदार निवडून येवू शकतो. तर शिल्लक मत २७ आणि इतर अधिक अपक्ष असे १६ मिळून चौथा खासदार देखील निवडून येण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT