Shivsena| Sachin Ahir  
मुंबई

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार; सचिन अहिर यांनी स्पष्टचं सांगितलं...

Shivsena| Sachin Ahir | संख्याबळा अभावी शिवसेनेला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्यासह ४० आमदारांनी केलेल्या बंडखोरीनंतर संख्याबळा अभावी शिवसेनेला (Shivsena) विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद मिळालं नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit pawar) विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले आणि त्यांनी कामला सुरुवातही केली. आता विधानसभेपाठोपाठ विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेच्या हातून जाणार असल्याचे वाटत असतानात शिवसेनेने विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे.

विधान परिषदेत आमच्याकडे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेलाच मिळायला हवे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांनी केली आहे. विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. सचिन अहिर म्हणाले, '' विधान परिषदेत शिवसेनेचे 13 आमदार आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षाही हे संख्याबळ सर्वाधिक आहे. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेलाच मिळायला पाहिजे. विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावर शिवसेनेकडून या पदावर दावा करु.''

याचवेळी त्यांनी शिवसेना नेत्यांच्या बंडखोरीमुळे आज आनंदाबरोबरच दु:ख होत असल्याचं म्हटलं. आज मी शपथ घेतली पण त्याच्या आनंदाबरोबर दुःख सुद्धा आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या वेळी जी लोकं आमच्यासोबत होती ती आता वेगळ्या प्रवाहात गेल्याचं दुःख आहे. पण त्यानंतर ज्या घडामोडी घडल्या त्याचा पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे सामना करत आहेत. भाजपकडून आता प्रभाग रचनेचा मुद्दा आता उपस्थित केला जात आहे, पण अशा पद्धतीने विसंगती निर्माण करून निवडणुका लांबणीवर टाकण्याचा भाजपचा डाव तर नाहीना? असा प्रश्नही सचिन अहिर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेची ओळख असलेल्या धनुष्यबाणावर दावा केल्याच्या मुद्द्यावरुनही भाष्य केले आहे. ''धनुष्यबाण शिवसेनेसोबतच राहणार. कोणी कितीही दावे केले तरी शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हं हे कायम शिवसेनेसोबत राहील. त्यांची शिवसेनेशी एवढी आपुलकी असती तर आतापर्यंत ते राजीनामा देऊन आले असते,'' असा टोलाही त्यांनी लगावला. ''आता शिवसेना नव्याने उभारी घेत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी मानसिकता तयार करून कामाला सुरुवात करावी लागेल,'' असंही अहिर यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT