The split in the Congress over going to the Krishna factory with Avinash Mohite
The split in the Congress over going to the Krishna factory with Avinash Mohite 
मुंबई

कृष्णा कारखान्यात अविनाश मोहितेंसोबत जाण्यावरून काँग्रेसमध्ये दुफळी

सचिन शिंदे

कऱ्हाड : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यात अविनाश मोहितेंसोबत जाण्यावरून काँग्रेस पक्षांतर्गत दुफळी निर्माण झाली आहे. त्यामुळे महिना उलटूनही दोन्ही मोहित्यांचे एकत्रिकरण झालेले नाही. अविनाश मोहितेंसोबत राहण्याचे राष्ट्रवादीचे ठरलंय. मात्र, काँग्रेसच्या गटात एकमत झालेले नाही. त्यामुळे काँग्रेसला सोबत घ्यायचे की नाही, याबाबत राष्ट्रवादीने भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसमध्ये डॉ. मोहिते यांच्याशिवाय अविनाश मोहिते यांना पाठिंबा देऊ या, असाही एक प्रवाह तयार आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षांतर्गत पेच सोडविण्याचे आव्हान आहे.
 
"कृष्णा' सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. कारखान्याच्या कच्च्या याद्या प्रसिद्धही झाल्या आहेत. गटांच्या बैठका, संपर्क दौरे कोरोना काळातही सुरू आहेत. सत्ताधारी भोसले गटाला सत्तेपासून रोखण्यासाठी राष्ट्रवादी व कॉंग्रेस एकत्र येण्याच्या हालचालींनाही वेग आला आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे अविनाश मोहिते व काँग्रेसचे डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या एकत्रिकरणास काँग्रेसमधून प्रयत्न सुरू आहेत. 

आमदार पृथ्वीराज चव्हाण, मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम आदी नेत्यांनी त्यासाठी बोलणी केली. दोन बैठकाही झाल्या. कऱ्हाडला कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्या प्रक्रियेला महिना लोटला. मात्र, अद्यापही त्यावर एकमत नाही. दोन्ही मोहित्यांनी एकत्र यावे, यासाठी काँग्रेसमध्ये हालचाली, तर राष्ट्रवादीच्या गोटात शांतता आहे. मंत्री पाटील, कदम यांच्यावर ते दोन्ही गट एकत्र आणण्याची जबाबदारी आहे. 

राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे सुरू असले तरी अद्याप अविनाश मोहिते यांच्याशी कोणीच संपर्क साधलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पूर्ण ताकदीने अविनाश मोहिते यांच्यासोबत आहे, हे जाहीर सभांतून व प्रमुख नेत्यांच्या भाषणातून दिसते आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचं ठरलंय. काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांच्याशिवाय अविनाश मोहिते यांना पाठिंबा देऊ या, असा एक प्रवाह तयार झाला आहे.

त्यामुळे काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसमध्ये एकत्रिकरणावरून निर्माण झालेला पेच नक्की सोडवण्याचे आव्हान नेत्यांसमोर आहे. त्यामुळेही एकत्रिकरण रखडले आहे. पृथ्वीराज चव्हाण, सतेज ऊर्फ बंटी पाटील, विश्वजित कदम तो पेच सोडवणार कसा, याकडे कृष्णाकाठचे लक्ष लागून आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT