Aschok Chavan letter to cm news
Aschok Chavan letter to cm news 
मुंबई

शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याने स्वतंत्र कृषी कायदा करावा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सरकारनामा ब्युरो

मुंबई ः केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र कायदा करावा, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. या कायद्यामध्ये शेतमाल खरेदीच्या व्यवहारासाठी किमान आधारभूत किंमत अनिवार्य करण्यासह शेतकरीहिताच्या विविध तरतुदींचा समावेश असावा, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

चव्हाण यांनी गुरूवारी रात्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भातील मागणीचे पत्र दिले. यावेळी राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड देखील उपस्थित होत्या. केंद्राच्या कृषी कायद्यांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी चांगले कायदे केले आहेत. या कायद्यांमुळे तेथील शेतकरी व ग्राहकांना दिलासा मिळणार आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने सुद्धा नवीन कायदा करून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे, असे चव्हाण यांनी म्हटले आहे.

खासगी खरेदीदारांना कृषीमालाच्या खरेदीचे करार व व्यवहार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने करण्यास प्रतिबंध घालणे, शेतमाल खरेदी-विक्रीबाबतचे करार व व्यवहारांसाठी शेतकऱ्याची संमती अनिवार्य करणे, फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा हक्क प्रदान करणे, शेतकऱ्यांची फसवणूक अथवा छळ केल्यास दीर्घ मुदतीचा कारावास तसेच मोठ्या रक्कमेच्या आर्थिक दंडाची तरतूद यात असावी.

तसेच व्यापाऱ्यांना शेतमालाचा अमर्याद साठा करता येणार नाही यासाठी साठवण क्षमतेवर मर्यादा घालणे, कृषीमालाच्या व्यवहारांसाठी इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लेटफार्मच्या माध्यमातून पारदर्शक लिलाव व ऑनलाईन पेमेंटची सुविधा प्रदान करणे आदी तरतुदींचा राज्याच्या कृषी कायद्यात समावेश असावा, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली  आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT