Sujat Ambedkar & Supriya Sule
Sujat Ambedkar & Supriya Sule Sarkarnama
मुंबई

सुजात आंबेडकरांना सुप्रिया सुळेंसह राज्यातील आणि देशातील 'हे' नेते आवडतात...

सरकारनामा ब्यूरो

पुणे : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेवर वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र तथा वंचित बहूजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी कडाडून टीका केली होती. त्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर सुजात आंबेडकरांनी 'सरकारनामा'ला दिलेल्या मुलाखतील राज्यातील आणि देशातील राजकारणावर आपले सडेतोड मतं मांडली आणि याचबरोबर राज्यातील आणि देशातील आवडत्या नेत्यांची नावेही सांगितले आहे.

सुजात आंबेडकरांनी मुलाखतीदरम्यान, राज ठाकरेंनी मशिंदीवरील भोंग्यावरून घेतलेल्या भूमिकेवर भाष्य केले. राज ठाकरेंना मशिंदीसमोर जर हनूमान चालिसा म्हणायची असेल तर आपल्या मुलाला म्हणजे अमित ठाकरेंनाही त्या आंदोलनात पाठवायला हवे, असे त्यांनी पुन्हा बोलून दाखवले. मात्र, माझा व्यक्तीगत अमित ठाकरेंवर कुठलाही राग नाही. मी फक्त राज ठाकरेंना समजावण्यासाठी ते एक उदाहरण दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याचबरोबर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणावर तसेच राज्यातील सरकारच्या कामगिरीवर बोलतांना सुजात यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली. हे सरकार जनतेला फसवत असुन सर्व गोलमाल सुरू आहे, अशी टीका केली. मात्र, हे सरकार दुर्देवाने पाच वर्ष पूर्ण करेल,असा अंदाजही व्यक्त केला. सत्तेच्या पाच वर्षानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेना कोणती भूमिका घेणार याकडेही आपले लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्याला बाळासाहेब (डॅा.प्रकाश आंबेडकर) सोडून राज्यातील आणि देशातील कोणता नेता आवडतो, असा प्रश्न सुजात यांना विचारण्यात आला. यावर बोलतांना सुजात यांनी राज्यातील आणि देशाच्या राजकारणातील काही नेत्यांची नावे सांगितले. त्यामध्ये राज्यातील नेत्यांमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची कामगिरी आपल्याला आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामध्ये सुप्रिया सुळे यांचे संसदेतील कामगिरीचे त्यांनी कौतुक केले तर शेट्टी यांचे थेट लोकांमध्ये उतरून काम करण्याच्या धडपडीचे कौतुक केले. याबरोबरच देशातील आवडत्या नेत्यांमध्ये व्ही.पी सिंग, काशीराम, शशी थरूर, असदुद्दीन ओवेसी, अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाच्या अतिशा मारलीना यांच्या शैक्षिणिक क्षेत्रात केलेल्या कामांचेही कौतूक केले आणि हे नेते आपल्याला प्रभावित करत असल्याचे सांगितले.

देशात अनेक चांगले नेते आहेत. मात्र, त्यांच्याकडे वाकड्या नजरेने बघितले जाते. त्याच्या राजकीय ताकदीकडे न बघता त्यांच्याकडे माणूस म्हणून बघत त्यांच्यातील गुणवत्तेची स्तुती करायला हवी व चांगसे गुण स्विकारायला हवे, असे मत सुजात यांनी व्यक्त केले. दरम्यान, मी आजघडीला वंचित बहूजन आघाडीचा अधिकृत कुठलाही पदाधिकारी नसून भविष्यात मला निवडणूक लढवण्याची इच्छाही नसल्याचे सुजात यांनी स्पष्ट केले. मात्र, वंचित बहूजन आघाडीच्या वाढीसाठी शक्य ते योगदान निश्चित देणार असून वंचित घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT