Supreme Court Hearing on Maharashtra Political Crisis Sarkarnama
मुंबई

Supreme Court : सोळा आमदार अपात्रतेचा मुद्दा.. ; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठी अपडेट..

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकर होण्याची शक्यता आहे. याबाबत ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर १४ जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे.

ही सुनावणी लवकर व्हावी, यासाठी ठाकरे गटाकडून आमदार सुनील प्रभू यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या सुनावणी दरम्यान काय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अडीच महिन्यांपूर्वी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शिंदे गटातील सोळा आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह या आमदारांना अपात्र करण्याबाबत योग्य तो निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र या निर्णयासाठीची वेळ ठरवून देण्यात आलेली नाही.

या याचिकेवर लवकर निर्णय घेण्याची मागणी सुनील प्रभु यांनी केली होती. यासह विधानसभा अध्यक्षांना निलंबनाबाबत निर्देश द्या, अशीही मागणी देखील या याचिकेत करण्यात आली आहे.

आमदार सुनील प्रभू यांनी मुख्य व्हिप म्हणून 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि इतर 15 बंडखोर आमदारांविरुद्ध अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यानंतर सुनील प्रभू यांनी ठाकरे गटाच्या वतीने या महिन्यात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

सर्वोच्च न्यायालयाने 11 मे रोजीच्या निकालात विधानसभा अध्यक्षांना याचिकांवर मुदतीत निर्णय घेण्याचे निर्देश दिले असतानाही राहुल नार्वेकर हे जाणूनबुजून सुनावणीला उशीर करत असल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार हे अपात्र ठरणार असल्याने भाजपने आधीपासूनच सरकारवर पायउतार न होण्यासाठी अजित पवारांनी यांना सरकारमध्ये सहभागी करून घेतल्याची चर्चा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

ठाकरे गटाचे आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदारांना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोटीस पाठवली आहे. या नोटीसीचे उत्तर त्यांना येत्या सात दिवसांत द्यावे लागणार आहे. तर न्यायालयाच्या आदेशानुसार नार्वेकर यांना सुद्धा 11 ऑगस्टच्या आधी 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होणार असून याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT