Suresh Lad Sarkarnama
मुंबई

कर्जतच्या आमदारांच्या नातेवाईकांनी ३५० एकर जमीन लाटली : राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

सरकारनामा ब्युरो

कर्जत : कर्जतचे विद्यमान शिवसेना आमदार महेश थोरवे (Mahesh Thorave) वादात सापडले आहेत. रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील मौजे नंदनपाडा, गोहे आणि गोठवली या भागातील तब्बल ३५० एकर औद्योगिक कारणांसाठी घेतलेली जमीन न्यूमिलेनियम कंपनीने आमदार महेंद्र थोरवे यांचे नातेवाईक, दोन विधानपरिषदेचे आमदार आणि सचिव स्तरावरील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना विकली असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड (Suresh Lad) यांनी केला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस संघर्षाला सुरुवात झाली आहे.

आमदार महेश थोरवे यांच्यावर आरोप करताना लाड यांनी शासन आणि प्रशासनाने कंपनीला दिलेली खरेदी ऑर्डर रद्द करावी अन्यथा २३ डिसेंबर रोजी खालापूर तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आत्मदहन करण्याचा इशाराही दिला आहे. अलिबागमधील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात पत्रकार परिषद घेऊन सुरेश लाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी अलिबाग तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष दत्ता ढवळे उपस्थित होते.

याबाबत सुरेश लाड यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, खालापूर तालुक्यातील मौजे नंदनपाडा, गोहे आणि गोठीवली या परिसरात ६३/१/अ अन्वये औद्योगिक कारणांसाठी जमीन खरेदी करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. न्यूमिलेनियम कंपनीने गतवर्षी या गावातील ९० शेतकऱ्यांकडून ३५० एकर जमीन औद्योगिक कारण सांगून खरेदी केली. हि खरेदी करताना न्यूमिलेनियम कंपनीने अनेक शेतकऱ्यांना जमीनीचा मोबदला दिला नाही. उलटपक्षी कोरोना आणि मंदीचे कारण पुढे करुन जमीन इतरांना विकण्यासाठी परवानगी मागितली. विशेष म्हणजे प्रशासनानेही परवानगी दिली. त्यानुसार कंपनीने आमदार महेंद्र थोरवे यांचे नातेवाईक, दोन विधानपरिषदेचे आमदार आणि सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांना ही जमीन विकली असल्याचा आरोपही लाड यांनी केला.

या प्रकरणात शेतकऱ्यांची बाजू कोणीच ऐकूण घेत नसून कंपनीने शेतकऱ्यांना दिलेले चेक देखील मुदतीत वटलेले नाहीत. तसेच कंपनी शासनाला अद्याप ३ कोटी ५२ हजार रुपये देणे बाकी आहे. मात्र जाणूनबुजून शासन आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत, असाही आरोप लाड यांनी केला. या सगळ्या विरोधात शेतकरी ३० नोव्हेंबरपासून उपोषणाला बसले आहेत, मात्र कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी २३ डिसेंबर रोजी खालापूर तहसिल कार्यालयासमोर शेतकऱ्यांसह आपणही आत्मदहन करणार असल्याचा इशारा लाड यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT