Sushma Andhare Sarkarnama
मुंबई

उद्धव ठाकरेंसारखा भाऊ संकटात होता म्हणून बहिण तत्परतेने पाठीशी उभी राहिली...

Sushama Andhare | Uddhav Thackeray : रक्षाबंधनदिवशी सुषमा अंधारेंनी सांगितले शिवसेना प्रवेशाचे कारण

सरकारनामा ब्युरो

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कधीकाळच्या फायरब्रँड नेत्या प्रा. सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी काहीच दिवसांपूर्वी शिवसेनेत (Shivsena) प्रवेश केला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासमोर आमदार निलम गोऱ्हे (Nilam Gorhe) यांच्याकडून शिवबंधन बांधून घेत त्या शिवसैनिक झाल्या. ठाकरे यांनीही त्यांचे स्वागत करुन त्यांना शिवसेना नेतेपदची जबाबदारी दिली. महाविकास आघाडीमध्येच असताना राष्ट्रवादी सोडून त्या शिवसेनेत का आल्या याबाबत त्यावेळी अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.

अखेर आज जवळपास दीड महिन्यांनंतर रक्षाबंधनाचे निमित्त साधून सुषमा अंधारे यांनी आपण शिवसेना प्रवेशाचे कारण सांगितले. फेसबूक पोस्टवरुन त्यांनी शिवसेना आमदार सचिन अहिर यांच्यासोबतच्या एका व्हॉट्सअॅप चॅटचा स्क्रीनशॉट शेअर करुन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सुषमा अंधारे यांची फेसबूक पोस्ट :

राखी पौर्णिमेच्या निमित्ताने...

मी शिवसेनेत का प्रवेश केला याचं हे उत्तर. सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन अत्यंत शांत संयमाने कुठलाही आकांडतांडव न करता मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल हा आक्रसताळेपणा न करता सगळा राजपाट सोडून वर्षा बंगल्यावरून परत येत होते. तेव्हा शिवसेनेशी अजिबात संबंध नसलेल माझं संपूर्ण कुटुंब डोळ्यात पाणी आणून त्यांचे राजीनाम्याचे भाषण जीव एकवटून ऐकत होतं...

बंगल्यावरून सन्माननीय मुख्यमंत्री निरोप घेत असताना कोरडवाहू शेतात राबणारी माझी आई घरात रडत होती. कोरोना काळात टीव्हीवर सातत्याने दोन माणसं ती आवर्जून बघत होती . त्यात एक सन्माननीय उद्धव ठाकरे आणि दुसरे आरोग्यमंत्री राजेश टोपेजी. कोरोना काळात आपल्या घरातला बाप भाऊ म्हणून एवढी आपली काळजी घेणारा देवमाणूस त्याच्या वाट्याला असा विश्वासघात का आला असेल? हा तिचा भाबडा प्रश्न.

हा क्षण माझ्यासाठी ऐतिहासिक क्षण होता. महाविकास आघाडीच्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गणराज्य संघ काम करत आहे. तिथे कोणीही दुखावलं नाही. आदरणीय पवार साहेब, सुप्रियाताई यांनी तर प्रचंड काळजी घेतली. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, भुजबळ साहेब, वंदना चव्हाण, अंकुश काकडे यांनी प्रचंड विश्वास दाखवला. म्हटलं तर काहीच अडचण नव्हती.

पण त्या क्षणाला हे मनापासून वाटलं की भविष्य काहीही असो. सत्ता असताना लाभाची पद असताना "जिकडे मेवा तिकडे थवा" असे ढिगाने सापडतील. पण या संकट काळात साथ द्यायला आपण उभे राहिले पाहिजे. आपला जीव लहान आहे आपल्या क्षमता किंवा आपल्याकडची संसाधन तुलनेने कमी असतील पण जो लढा सन्माननीय उद्धवसाहेब उभा करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यात एक शिपाई म्हणून आपण असलं पाहिजे. एक खारीचा वाटा उचलला गेला पाहिजे. असं प्रकर्षाने वाटलं.

बस्स. त्याच क्षणी सचिन भाऊ आहेर यांना एक मेसेज टाकला. सोबत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये मेसेज केलेली तारीख 29 जून अर्थात् विश्वासदर्शक ठरावाच्या पूर्वसंध्येला आणि वेळ रात्री नऊ वाजून 54 मिनिटं अर्थात साहेब बंगल्यावरून पायऱ्या उतरत असतानाची वेळ आहे. अन् बस्स, ठरवलं की लढायचे आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता... समोर दिसणाऱ्या कुठल्याच आव्हानांची पर्वा न करता ...

असं म्हणतात की चांगला विचार मनात फार दीर्घकाळ टिकत नाही त्यामुळे विचार मनात आल्याबरोबर लगेच अंमलात आणावा. क्षणार्थ मी मेसेज सचिन भाऊंना सेंड केला आणि तितक्याच तत्परतेने त्यांचं प्रत्युत्तर आलं. आयुष्यात मातोश्रीवर पहिल्यांदा मी सन्माननीय उद्धव साहेबांना भेटायला गेले. इथलं सगळच वातावरण माझ्यासाठी नवीन होतं. त्याहीपेक्षा नवीन होतं ते मातोश्रीच आदरातिथ्य..

पहिल्याच भेटीतलं उद्धव साहेबांचं पहिलंच वाक्य होतं , "ताई तुम्ही अत्यंत चुकीच्या वेळेला माझ्याकडे आलात माझ्याकडे द्यायला काहीच नाही" राजकारणात इतकं सरळ आणि इतकं स्पष्टपणे कुणी कसं बोलू शकतं? क्षमता असेल किंवा नसेल पण किमान कार्यकर्ता आपल्याला जोडूनच घ्यायचा आहे म्हणून तरी पुढारी खोटी वचनं.. आश्वासन किंवा आमिष दाखवेल. पण यातलं काहीच घडलं नाही. उलट ते मला सांगत होते की, मी काहीच देऊ शकत नाही मी एकटा आहे तुम्ही आलात तर तुमच्यासह नाही आलात तर तुमच्या शिवाय पण मी लढायचं हे नक्की ठरवलं आहे..! क्षणाक्षणाने माझा इरादा मात्र अजून जास्तच पक्का होत होता..

पाच-सहा दिवसांचा वेळ मला महाविकास आघाडीतल्या सगळ्याच लोकांशी बोलण्यासाठी हवा होता. काँग्रेसमध्ये असणारे डॉ. नितीन राऊत, गणराज्य संघ, सुप्रियाताई , पवार साहेब, सगळ्यांनाच स्वच्छ आणि स्पष्ट बोलायचं होतं. कारण आम्ही कुणावरही नाराज होऊन चिडून किंवा माझ्यावर अन्याय होतोय म्हणून जात नव्हते किंवा मला पुढे कुठे काही सत्तेचा लाभ सत्तेचं लाभाचं पद मिळणार नव्हतं.." निर्णय संपूर्णतः मी माझा सद्सदविवेक ठेवून घेतलेला निर्णय.. ! आणि सूत्र एकच, सध्या शिवसेनेच्या परिवाराला माझी गरज आहे आणि याहीपेक्षा लाखपटीने जास्त या महाराष्ट्राला शिवसेनेची गरज आहे.. !

ही आख्यायिका किती खरी किती खोटी मला माहित नाही. पण नेहमीच बहिणी संकटात असतील तर भाऊ मदतीला येतात अशी आख्यायिका आहे. मग जर भाऊ संकटात असेल तर बहिणींनी सुध्धा तितक्याच तत्परतेने ऊभे राहिले पाहिजे... नाही का ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT