Vasai Crime Sarkarnama
मुंबई

Video Vasai Crime : माणुसकीचा मुडदा पडला! वसई हत्याप्रकरण; विरोधकांचा संताप; सरकार पुन्हा 'बॅकफूट'वर?

Sushma Andhare : मृत तरुणीला आरोपी त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्याची माहिती मुलीच्या पालकांनी दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला.

Sunil Balasaheb Dhumal

Mumbai Crime News : वसईतील चिंचपाडा येथे एका माथेफिरू तरुणाने भररस्त्यात तरुणीवर लोखंडी पान्याने हल्ला करत निर्घृण हत्या केली. त्यावेळी रस्त्यावर आणि आजूबाजूला बघ्यांची गर्दी होती. पण तरुणीला वाचविण्यासाठी कोणीही पुढे आले नाहीत. पण या घटनेनंतर आता राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. वसईत माणुसकीचा मुडदा पडल्याची टीका केली जात आहे.

विरोधकांनी या घटनेवरुन सरकारवर टीकेची तोफ डागण्यास सुरुवात केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत .तर राज्य महिला आयोगही आक्रमक पावले उचलण्याच्या तयारीत आहे.

शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे Sushma Andhare यांनी सरकरारसह पोलिसांच्या कारभारावर बोट ठेवले आहे. त्या म्हणाल्या, वसईतील हत्या काळजाचा थरकाप उडवणारी आहे. दिवसाढवळ्या भररस्त्यात तरुणीची हत्या होते आणि लोक फक्त बघ्याची भूमिका घेतात हे चित्र विदारक असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

कायद्याचा बडगा हा अनेकदा चोर सोडून संन्याशाला फाशी देणाऱ्याच्या माथी पडतो. मदत करायला आलेल्या माणसांना पोलिस ठाण्याच्या चकरा माराव्या लागतात, अशी भावना लोकांत आहे. त्याचाच परिणाम की काय म्हणून लोक पुढे येऊन मदत करताना दिसत नाहीत. रस्त्यात हत्या होताना त्या मुलीला कुणी मदत केली नाही. मुंबईजवळील या गंभीर घटनेने राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले आहे, असेही अंधारे म्हणाल्या.

दरम्यान, काही सेकंदात पान्याचे 15 वार करून मुलीला ठार केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या प्रकरणी राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत तरुणीला आरोप त्रास देत असल्याची तक्रार पोलिसांकडे केल्याची माहिती मुलीच्या पालकांनी दिली होती. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

या हत्या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घेतल्याचे अध्यक्षा रुपाली चाकणकर Rupali Chakankar यांनी सांगितले आहे. आरोपीवर कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. वालीव ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून सखोल तपास करून आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र करावे असे निर्देश दिले आहेत. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आयोग पाठपुरावा करेल. मुलांचे असे हिंसक वागणे, हत्या करण्यापर्यंत मजल जाणे आणि सोबतच अशी घटना घडत असताना लोकांनी बघ्याची भूमिका घेणे चिंताजनक आहे, असेही त्या म्हणाल्या.

गृहमंत्री फडणवीस काय म्हणाले..?

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वसईतील घटनेवर भाष्य केले आहे. त्यांनी सोशल मीडियावरील x या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. ते पोस्टमध्ये म्हणतात, वसईत एका तरुणीची भररस्त्यात हत्या झाल्याची घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी आहे. मीरा-भाईंदर पोलिस आयुक्तांना या घटनेसंदर्भात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोपीला अटक करण्यात आली असून, सखोल तपास करुन, न्यायालयात सुद्धा भक्कम पुराव्यानिशी बाजू मांडून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा होईल, यादृष्टीने निर्देशित करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT