Jayant Patil, Ajit Pawar ANI
मुंबई

कोरोना जाऊदे सगळीकडे आनंदाचं वातावरण राहूदे : अजित पवार

अजित पवार, जयंत पाटील यांनी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात (siddhivinayak ganpati) दर्शन घेतलं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यानी परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिगांचे दर्शन घेतलं.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाविकास आघाडी सरकारनं दीड वर्षानंतर आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली केली. मंत्रीमंडळातील अनेक मंत्र्यांनी पहाटेच जाऊन दर्शन घेतलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मुंबईत सिद्धिविनायक मंदिरात (siddhivinayak ganpati) दर्शन घेतलं. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यानी परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिगांचे दर्शन घेतलं. ''कोरोना जाऊदे सगळीकडे आनंदाचं वातावरण राहूदे हेच मागणं आहे,'' अशी प्रार्थना राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सिद्धिविनायकाचे दर्शन केल्यानंतर केली.

सिद्धिविनायकांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, ''कोरोनाचे संकट गेले दीड वर्षे आहे. त्यामुळे मंदिरं बंद ठेवावी लागली होती. कारण जिथं श्रध्दा असते तिथं भाविक मोठया संख्येने जात असतात. पहिली लाट आली दुसरी लाट त्यानंतर सर्वांचं म्हणणं होतं की आता मंदिरं खुली करायला हवीत. आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. आजपासून सर्व मंदिरं उघडण्यात अली आहेत. गर्दी होऊ नये, यासाठी आम्ही लवकर आलो होतो. आमचा त्यांना त्रास होऊ नये, यासाठी आम्ही लवकर आलो. आर्शीर्वाद मागितले आहेत की लवकरात लवकर कोरोना जावो. आता खूप महत्त्वाचे सण येत आहेत अशा काळात कोरोनाशी संबंधित नियम पाळावेत, अशी सर्वांना विनंती आहे.''

जिल्हा परिषद पोटनिवडणूनक निकालाबाबत अजित पवार म्हणाले की, कालच्या निवडणूकीच्या निकालात आम्ही सर्वत्र एकत्र लढलो नसलो तरी आम्हांला चांगलं यश मिळालं. आमची तिघांची मत एकत्र केली तर तो आकडा मोठा होतो आहे. आम्ही स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेतला होता. जनतेने देखील आम्हाला समाधानकारक निकाल दिला आहे.

''काल महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांची बैठक झाली. यामध्ये शेतकऱ्यांना ज्याप्रकारे चिरडण्यात आलं त्याचा निषेध करण्यात आला. मागील काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. त्याच्यातून मार्ग काढता येऊ शकतो. परंतु तरीदेखील तसं होताना दिसत नाही. थेट शेतकऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होतो. ही काय मोघलाई लागून गेली आहे का? आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने आहोत. जर कोणी चुकीचं वागत असेल तर त्यावर कारवाई व्हायला हवी. त्याकरिता 11 तारखेला आम्ही संप करण्याचा निर्णय घेतला आहे,'' असे अजित पवारांनी सांगितले.

''टप्प्या टप्प्याने नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे सुरू आहेत. अडीच महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे पुर आला होता आता तिथं केंद्रीय टीम आली आहे. त्यांनी लवकर यायला हवं होतं. अडीच महिन्यांत चित्र बदलून जात. आम्ही तातडीच्या मदतीसाठी निधी जाहीर केली आहे, '' असे पवार म्हणाले.

काल राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणावरुन भाजपवर टीकास्त्र सोडले. याबाबत अजित पवार म्हणाले की नवाब मलिक यांना जे योग्य वाटतं ते दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. काय वस्तुस्थिती आहे हे लक्षात घ्यायला हवी.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT