Thane Municipal Corporation : ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अवघ्या काही दिवसांतच फेरबदल करण्यात आले आहेत. डॉ. नितीन राठोड यांची काही दिवसांपूर्वीच अतिरिक्त आयुक्त-१ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी जबाबदाऱ्यांची फेरवाटणी करत राठोड यांना अतिरिक्त आयुक्त-२चा दर्जा दिला आहे.
या फेरबदलामुळे राठोड यांची नियुक्ती, त्यांना देण्यात आलेली सुरुवातीची जबाबदारी आणि अवघ्या 15 दिवसांच्या आत झालेला बदल यावरून महापालिका वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, डॉ. राठोड यांची नियुक्ती राज्याच्या नगरविकास विभागाने केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
शिंदेंच्या कार्यालयातील विश्वासू अधिकारी ठाणे पालिकेत
ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त मनीष जोशी 31 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त आयुक्तपद रिक्त झाले होते. त्यानंतर नगरविकास विभागाने 4 सप्टेंबर रोजी शासन आदेश काढून डॉ. नितीन राठोड यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली. त्यानंतर त्यांनी लगेचच पदभार स्वीकारला.
डॉ. राठोड हे सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-अ अधिकारी असून अस्थिव्यंगोपचार तज्ज्ञ आहेत. यापूर्वी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात विशेष कार्य अधिकारी (OSD) म्हणून कार्यरत होते. त्यामुळे शिंदे यांच्या विश्वासातील अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
ठाणे महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तपद प्रशासकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. विविध विभागांचा समन्वय, विकासकामे, नागरी सुविधा आणि महत्त्वाच्या प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये अतिरिक्त आयुक्तांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे राठोड यांची या पदावर नियुक्ती चर्चेचा विषय ठरली होती.
काही दिवसांतच ‘अतिरिक्त आयुक्त-१’ वरून ‘अतिरिक्त आयुक्त-२’
डॉ. राठोड यांनी काही दिवसांपूर्वी अतिरिक्त आयुक्त-१चा कार्यभार स्वीकारला होता. मात्र, आता आयुक्त सौरभ राव यांनी महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या कामकाजाची नव्याने विभागणी केली आहे. या फेरवाटपानुसार प्रशांत रोडे यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-१, तर डॉ. नितीन राठोड यांच्याकडे अतिरिक्त आयुक्त-२ची जबाबदारी देण्यात आली आहे.
‘दर्जा’ बदलल्याची चर्चा का?
राठोड हे थेट शिंदे यांच्या कार्यालयाशी संबंधित राहिलेले अधिकारी असल्याने त्यांच्या नियुक्तीला सुरुवातीपासूनच राजकीय आणि प्रशासकीय महत्त्व प्राप्त झाले होते. ठाणे महापालिकेतील महत्त्वाच्या अतिरिक्त आयुक्तपदावर त्यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कार्यपद्धतीकडेही लक्ष लागले होते.
मात्र, काही दिवसांतच आयुक्तांनी जबाबदाऱ्यांची फेरवाटणी केली. पण ‘अतिरिक्त आयुक्त-१’ची जबाबदारी मिळाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच ती बदलण्यामागे नेमके काय कारण आहे? राव यांनी कोणाच्या सांगण्यावरून हा दर्जा बदल केला की नियमाच्या अधिनस्त राहून हा निर्णय घेतला आहे? अशी चर्चा पालिका वर्तुळात सुरू झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या कारभारावर परिणाम काय?
ठाणे महापालिकेत सध्या विविध मोठ्या विकासकामांसोबतच पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य आणि नागरी सुविधांशी संबंधित अनेक प्रश्न आहेत. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमधील फेरबदल महत्त्वाचा मानला जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.