Thane Municipal Election 2025 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के यांच्या लेकाला उमेदवारी नाकारण्यात आली आहे. म्हस्के यांच्याकडून मुलगा आशुतोष यांना प्रभाग क्रमांक १९ मधून उमेदवारीसाठी प्रयत्न करत होते. आशुतोष यांनीही मतदारसंघात जोरदार बांधणी केली होती. मात्र, पक्षांतर्गत विरोधानंतर म्हस्के यांना शिंदेनी तिकीट नाकारले. त्यावरून मतदारसंघातून नाराजीचा सूर उमटत आहे.
खासदार म्हस्के यांच्या समर्थकांनी उमेदवारी नाकारल्याने संताप व्यक्त केला. त्यानंतर आशुतोष यांनी आज सोशल मीडियात एक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी प्रभागातील नागरिकांना भावनिक आवाहन केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मला तिकीट मिळालं नाही त्यामुळे माझ्या प्रभागातल्या लोकांची फारच निराशा झाली. त्या सगळ्या माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी हा पत्रप्रपंच, असे त्यांनी म्हटले आहे.
आशुतोष म्हस्के यांची पोस्ट...
माझे वडील माननीय नरेश म्हस्के साहेब आणि मी ,आम्हा दोघांचाही जन्म ह्याच प्रभागातला. आम्ही लहानाचे मोठे इथेच झालो. आनंद नगर, गांधी नगर कुष्ठरुग्ण वसाहत आणि आजूबाजूचा परिसर म्हणजे आमचं घर ....परिवारच!!
माननीय म्हस्के साहेब महापौर झाल्यानंतर आणि मला समज आल्यापासून या प्रभागात मी जमेल ते आणि पडेल ते काम करत आलो आहे आणि प्रत्येक कुटुंबाशी आमचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. स्वाभाविकपणे म्हस्के साहेब खासदार झाल्यानंतर माझ्या प्रभागातल्या या परिवारातील सदस्यांची मी त्यांचा प्रतिनिधित्व करावे अशी इच्छा होती.
आम्ही शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली लहानाचे मोठे झालो. त्यामुळेच मी निरपेक्ष आणि मनापासून काम कायमच करत आलोय. शिवसेनेचा आणि माझ्या वडिलांचा तो वारसा मला मिळाला आहे. प्रत्येक घरातली अडचण समजून आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि माझे वडील यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभागात शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत केली. आणि मेंटल हॉस्पिटल परिसर, रघुनाथ नगर, हजुरी परिसर या भागा मध्येही हि संपर्क ठेवून काम केले .
या साऱ्या पाठीमागे कोणतीही अपेक्षा नव्हती. परंतु आनंदनगर आणि गांधीनगर तसेच आजूबाजूच्या परिसरामधील मधल्या लोकांच्या आग्रहस्तव त्यांचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी मी अंगावर घेतली आहे.
निवडणुका आल्या तसा हा आग्रह अधिक वाढू लागला. परंतु पक्ष स्तरावरच्या अडचणी वेगळ्या असतात आदरणीय शिंदे साहेबांचाही काहीतरी नाईलाज झाला असेल. शेवटी कुटुंबातल्या हट्टी मुलांचं लगेच ऐकलं जातं. समंजस मुलाला बरेचदा माघार घ्यावी लागते तसंच काहीसं झालं असेल.किंवा माझ्यात काहीतरी कमी असेल किंवा मी त्या योग्यतेचा नसेल....
माझा कोणावरही राग नाही. मी कायम काम करत आलो आहे आणि करत राहीन. पक्ष देईल ती जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडण्याचा प्रयत्न करेन.
माझ्या प्रभागातल्या माझ्या सर्व नागरिकांना मी एवढेच सांगेन....
तुमची नाराजी आणि खंत मी समजू शकतो. पण मी सदैव तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
तुमचे आशीर्वाद आणि साथ सदैव सोबत असू द्या.
नसेल मिळाली संधी तरी ताठ आहे कणा
पाठीवरती हात ठेवा, फक्त 'लढ' म्हणा...
तुमचा,
आशुतोष नरेश म्हस्के.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.