Health Minister Rajesh Tope Sarkarnama
मुंबई

घोळाची आरोग्य विभागाकडून कबुली; रविवारच्या परिक्षेवर प्रश्नचिन्ह

विभागाकडून अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्यभरात नुकत्याच झालेल्या गट क मधील पदांसाठीच्या परीक्षेच अनेक घोळ झाल्याची कबुली आरोग्य विभागानेच (Health Department) दिली आहे. विभागाकडून तसा अहवाल राज्य सरकारला पाठवण्यात आला आहे. न्यासा या कंपनीने परिक्षा घेताना अनेक ठिकाणी निष्काळजीपणा दाखवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच कंपनीला ब्लॅक लिस्ट करण्याचा इशाराही दिला आहे. त्यामुळे रविवारी (ता. 31) होणाऱ्या गट ड मधील पदांच्या परिक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाने राज्य सरकारला दिलेला अहवाल 'साम'च्या हाती लागला आहे. आरोग्य विभागाच्या गट कमधील पदांच्या भरतीसाठी 24 तारखेला राज्यभरात परिक्षा घेण्यात आली. न्यासा या कंपनीला परिक्षेच्या नियोजनाचे काम देण्यात आले आहे. आधीच या परिक्षेची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. परीक्षार्थींना वेळेत प्रवेशपत्र न मिळणे, परिक्षा केंद्रांचे नियोजन नसणे यांसह अन्य काही तांत्रिक कारणांमुळे परिक्षा 24 तारखेला घेण्यात आली. पण परिक्षेतील घोळ यादिवशीही दिसून आले.

याबाबत आरोग्य विभागाने परिक्षेदरम्यान आढळून आलेल्या अनियमिततेबाबत अहवाल तयार करून राज्य सरकारला पाठवला आहे. त्यामध्ये अनेक गंभीर खुलासे करण्यात आले आहे. परीक्षा केंद्रांवर पेपर उशिरा पोहचले, साकीनाका तसेच इतर ठिकाणी पेपर फोडण्यात आले किंवा फुटले, अनेक परिक्षा केंद्रांवर मोबाईल जॅमर नव्हते, न्यासाच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाचा अभाव, कोल्हापूरात काही विद्यार्थी प्रश्नपत्रिकेसह उत्तरपत्रिकाही घरी घेऊन गेल्याचा धक्कादायक दावा अहवालात करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे अनेक परीक्षा केंद्रांवर परिक्षेवर नियंत्रण ठेवणारे पर्यवेक्षकच नव्हते, असा गंभीर प्रकारही समोर आला आहे. विशेष म्हणजे अनेक परिक्षा केंद्र वेळेत उघडण्यात आली नाही. परीक्षार्थी आल्यानंतरही केंद्र बंदच असल्याचे दिसून आले. काही परिक्षा केंद्रांवर वेगवेगळ पेपर देण्यात आले. एका पदासाठी अर्ज केलेला असताना दुसऱ्याचे पदासाठीचा पेपर परिक्षार्थींना देण्यात आल्याचा प्रकार अहवालात नमूद करण्यात आला आहे.

पिंपरीतील वसंतदादा पाटील विद्यालयालयात 15 विद्यार्थांना प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. वाईतील क्रांतीवीर महाविद्यालयातील एका विद्यार्थाला सेंटर कोड आणि परिक्षा केंद्राच्या नावाशिवाय प्रवेशपत्र दिले गेले, असे अहवालात म्हटले आहे. दरम्यान, न्यासाला यावर 48 तासांत खुलासा करण्यास सांगितले आहे. खुलासा आल्यानंतर कंपनीला काळ्या यादीत टाकण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

परिक्षेवर प्रश्नचिन्ह

आरोग्य विभागातील गट डच्या पदांच्या भरतीसाठीची परिक्षा ता. 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. गट क च्या परिक्षेदरम्यान झालेल्या घोळांमुळे आता या परिक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यासाला काळ्या यादीत टाकल्यास ही परिक्षा कशी होणार, याबाबत संभ्रम आहे. त्याचप्रमाणे या कंपनीला काळ्या यादीत टाकले नाही तरी आधीच्या परिक्षेप्रमाणेच रविवारच्या परिक्षेतही अनेक घोळ होण्याची भीती परीक्षार्थींना आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT