Atul Londhe
Atul Londhe Sarkarnama
मुंबई

मोदीविरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची नैसर्गिक जबाबदारी कॉंग्रेसची !

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देश पातळीवर एक सक्षम राजकीय पर्याय निर्माण करण्याची तयारी सध्या सुरू आहे. या आघाडीतील मोठा पक्ष या नात्याने आघाडीचे नेतृत्व करण्याची नैसर्गिक जबाबदारी कॉंग्रेस पक्षाकडे येते. त्यामुळे कॉंग्रेसकडेच या आघाडीचे नेतृत्व मिळणे अपेक्षित आहे, असे मत कॉंग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केले आहे.

येत्या दोन दिवसात ज्येष्ठ नेते शरद पवार व बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिल्लीत भेट होणार आहे. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, महाराष्ट्रातून शिवसेना, राष्ट्रवादी क्रॉंग्रेस, तेलंगणातून चंद्रशेखर राव, यांच्यासह अन्य राज्यातील प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याचे नियोजन सुरू आहे.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी देशभरातील मोदीविरोधकांनी एकत्र येऊन आघाडी स्थापन करावी यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार हेदेखील यासाठी आधीपासूनच प्रयत्नशील आहेत.

या संदर्भात लोंडे यांनी एक व्हीडीओ प्रसिद्ध केला आहे. अशाप्रकारच्या आघाडीचे त्यांनी स्वागत केले आहे. मात्र, कॉंग्रेस हा देशव्यापी पक्ष आहे. देशातील प्रत्येक राज्यात पक्षाचे अस्तित्व आहे.त्यामुळे विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी कॉंग्रेसचीच आहे, अशी भूमिका लोंढे यांनी मांडली आहे.

लोंढे यांनी ही भूमिका मांडली असली तरी दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतील का ? आणि आले तर ते कॉंग्रेसचे नेतृत्व मान्य करतील का, असा प्रश्‍न आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात एकमुखी आघाडी तयार होणे कितपत शक्य आहे हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT