Pankaja Munde News Sarkarnama
मुंबई

Pankaja Munde News: पंकजा मुंडे शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेवर...?

Maharashtra Politics News : अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Maharashtra Politics News : शिंदे फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार यांचे कट्टर समर्थक आणि बीड जिल्ह्यातील परळीचे आमदार धनंजय मुंडे यांची देखील मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आजच्या शपथविधीनंतर राज्यात शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अशा तीन इंजिनचे सरकार सत्तेमध्ये आले आहे. तरी यामुळे परळी या विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या चुलत भावंडांमध्ये राजकीय रस्सीखेच होणार हे आज स्पष्ट झाले आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या तिन्ही पक्षात जागा वाटपाची चर्चा सुरू होईल. त्यावेळी सहाजिकच विद्यमान आमदार आणि मंत्री म्हणून परळीतून धनंजय मुंडे यांच्याच नावाची शिफारस युतीचे उमेदवार म्हणून केले जाईल. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन करणे भाजपाला जवळपास अशक्य असल्याने लोकसभा निवडणुकीच्या आधी पंकजा मुंडे या भाजपा सोडून अन्य पक्षाचा मार्ग अवलंबतील अशी शक्यता बीडमधून व्यक्त केली जात आहे.

पंकजा मुंडे यांना 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाकडूनच (BJP) त्यांना पराभूत करण्यात आले त्यांच्या समर्थकांची धारणा आहे. तेव्हापासून पंकजा मुंडे (Pankaja Munde) या भाजपामध्ये अस्वस्थ आहेत. त्यांनी अनेक वेळा मनातली सल बोलून दाखवली. गेल्या आठवड्यातच परळीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या एका कार्यक्रमात पंकजा यांनी त्यांची स्वतःची उमेदवारी परळीतून तर त्यांच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षाची बीडमधून उमेदवारी जाहीर केली.

खरतर उमेदवारी जाहीर करणे हा पक्षाचा आणि पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष यांचा निर्णय असतो त्यांचा अधिकार असतो. मात्र, पंकजा मुंडे यांनी थेट या अधिकारात हस्तक्षेप करून त्यांच्यातील बंडखोर स्वभावाची झलक पुन्हा एकदा दाखवली आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे त्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिवसेनेत (Shivsena) प्रवेश करतील, अशी चर्चा आणि शक्यता होती. मात्र, पक्षातील काही नेत्यांनी आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी त्यांना सबुरीचा सल्ला दिल्याने त्या थांबल्या, अशी चर्चा आहे.

पंकजा मुंडे यांच्या भगिनी डॉ. प्रीतम मुंडे या लोकसभेच्या सदस्य असून त्यांची ही दुसरी टर्म आहे. डॉक्टर प्रीतम यांना तिसऱ्यांदा संधी मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यांच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना लोकसभेला पाठवणे हे त्यांना यांना मान्य नसेल. परळीत पुन्हा धनंजय मुंडे यांनाच तिकीट मिळणार. यावर आज शिक्कामोर्तब झाल्याने पंकजा मुंडे या पक्षातून बाहेर पडतील, अशी शक्यता बीडमधील राजकीय निरीक्षक वर्तवत आहेत.

राज्यात भाजप शिंदे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) सत्तेत एकत्र असल्यामुळे पंकजा मुंडे यांच्यापुढे अन्य पक्षात प्रवेश करण्यासाठी काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांची शिवसेना हे दोनच पर्याय उपलब्ध राहतात. त्यापैकी काँग्रेसची वैचारिक सूत जुळत नसल्याने आणि उद्धव ठाकरे यांच्याशी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यापासूनचे कौटुंबिक संबंध असल्यामुळे त्या उद्धव ठाकरे गटात सहभागी होण्याची जास्त शक्यता आहे, असा दावा केला जात आहे.

मधल्या काळात खासदार इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांना एमआयएम पक्षात सामील व्हा, असे आमंत्रण दिले होते. तर बीआरएस पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी देखील पंकजा मुंडे यांना त्यांच्या पक्षात सामील होण्याचे आवाहन केले होते. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला अधिक पसंती देतील अशी शक्यता आहे. फक्त हा पक्ष प्रवेश कधी होईल याबद्दल तूर्तास काही सांगणे अशक्य आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT