Tukaram Munde News
Tukaram Munde News Sarkarnama
मुंबई

मुख्यालयी राहा, २४ तास ड्युटीचे झंजट संपले; अखेर डॉक्टरांच्या लॉबीने केली मुंढेंची उचलबांगडी

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आरोग्य संस्थांना अचानक भेटी, मुख्यालयी न राहणाऱ्यांना वेतनकपात व घरभाडे कपातीच्या नोटीसा, २४ तास ड्युटी करा, इंटर्नशिप करणाऱ्यांनीही ड्युटी करावी लागेल, अशी नियमानुसार शिस्त घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोग्य अभियान आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Munde) यांना डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या संघटनांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यानंतर आता मुंढेंची बदली झाली आहे. त्यामुळे आता डॉक्टरांच्या मागील झंजट संपली आहे.

खात्यांतर्गत राजकीय वर्तुळातही त्यांच्याबद्दल रोष टोकाला गेल्याने त्यांच्या बदलीच्या हालचाली सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्यांची आज बदली करण्यात आली आहे. मुंढे यांच्या बदली आदेशामध्ये म्हटले आहे की, शासनाने आपली बदली केली असून आपण आपल्या आयुक्त, कुटुंबकल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान या पदाचा कार्यभार प्रधान सचिन, सार्वजनिक आरोग्य विभाग यांचेकडे आणि आपल्याकडे अतिरिक्त स्वरुपात सोपविण्यात आलेल्या प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून कार्यमुक्त व्हावे व पुढील आदेशाची प्रतिक्षा करावी, असे म्हटले आहे.

भारतीय प्रशासन सेवेतील वरिष्ठ अधिकारी असलेले तुकाराम मुंढे जिल्ह्यातील ताडसोन्ना येथील रहिवाशी आहेत. शिस्तीचे अधिकारी अशी त्यांची प्रशासनात ख्याती आहे. त्यांच्या शिस्तीच्या बडग्यामुळे प्रशासन ताळावर येते आणि संबंधीत खात्याचा लाभ तळागळापर्यंत पोचतो. मात्र, त्यामुळे मग मुंढे स्थानिक सत्ताधाऱ्यांपासून खात्यालाही नकोसे होतात असा पुर्वानुभव आहे.

त्यांचे व सत्ताधाऱ्यांचे खटके उडाल्याने त्यांच्या कायम बदल्या होतात आणि त्यांच्या समर्थनार्थ सामान्य लोकांचा त्यांच्या भूमिकेला पाठींबा मिळाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढेंसारखा अधिकारी खात्याची आरोग्य सेवा सामान्यांपर्यंत पोहचवतील या भावनेने त्यांची आरोग्य अभियान आयुक्त म्हणून नेमणूक केली होती. मात्र, रुजू होताच तुकाराम मुंढे यांनी अगोदर वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लावण्याचे काम हाती घेतले आणि त्यांना फटका बसला.

यासाठी रात्रीच्या वेळी अचानक आरोग्य संस्थांना भेटीचे सत्र सुरु झाले होते. मुख्यालयी न आढळणाऱ्यांना नोटीसा, त्यांचे घरभाडे भत्ता कपात करण्याचे आदेश, इनर्टनशिप करणाऱ्यांनी ड्युटीच केली पाहीजे यासाठी प्रयत्न, प्रतिनियुक्त्या बंद करा असे एक ना अनेक आदेश दिले. त्यामुळे उंटावरुन शेळ्या हाकणाऱ्या आणि कधीतरी प्राथमिक आरोग्य केंद्राला सोयीनुसार चक्कर मारणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची तारांबळ उडायला सुरुवात झाली होती. अधिकाऱ्यांच्या संघटनांनी मुंढेंच्या निर्णयांना विरोधासाठी काळ्या फिती, सोशल मिडीयावर मतमतांतरे सुरु केली होती.

दरम्यान, खात्यात मंत्र्यांपेक्षा मुंढेंचीच चर्चा अधिक सुरु होती. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नाराजीचा फटका भविष्यात बसण्याची भितीही निर्माण झाली होती. दरम्यान, तसे आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) जवळचे आणि सत्तांतरापूर्वीच्या गुवहाटी दौऱ्यात मोलाचा वाटा उचलणारे आहेत. त्यांनाही मुंढे नकोसे झाल्याची चर्चा होती. त्यामुळे दहाएक दिवसांपूर्वी मंत्र्यांनी अनेक जिल्ह्यांतील जेष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून मुंडेंबद्दल माहिती घेतली होती. मुंढेंच्या शिस्तीमुळे काम व ताण वाढल्याने सहाजिकच अधिकाऱ्यांनीही नाराजीचाच सुर आळवला.

त्यानंतर चार दिवसांनी मंत्री सावंत यांनी बोलावून मुंढेंना काही सुचनाही दिल्या होत्या. तेवढ्यावर न थांबता मुंढे आपल्या खात्यात नकोत, असा आग्रहच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यानंतर शिंदेही राजी झाल्याची माहिती होती. त्यामुळे तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या प्रक्रीयेला वेग आला होता. मुंढे अल्पकाळच टिकतात असे जुने अनुभव असले तरी ते आरोग्य विभागात रुजू होऊन पुरते दोनेक महिनेही झाले नाहीत. तोच त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT