Maharashtra assembly update : धडाकेबाज IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या दिव्यांग कल्याण विभागाशी संबंधित मुद्द्यांवर विधानसभेत चर्चा झाली. काही आमदारांनी बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. याअनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत चर्चेला उत्तर देताना दिव्यांग विभागात सुरू असलेल्या कामावर एकप्रकारे समाधान व्यक्त केले आहे.
तुकाराम मुंढे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. मुंढे यांनी म्हटले आहे की, दिव्यांगत्वाचे बोगस किंवा चुकीचे UDID प्रमाणपत्र घेऊन शासकीय नोकरी किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ, गैरफायदा घेणे गुन्हा आहे. पडताळणीअंती अशा बोगस व्यक्तींविरोधात कारवाई प्रगतिपथवार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?
मुख्यमंत्री फडणवीस बुधवारी विधानसभेत बोलताना म्हणाले की, बोगस दिव्यांग प्रमाणपत्रांबाबत चौकशी झाली आहे, कारवाई सुरू आहे. दिव्यांग कल्याण विभागाने अतिशय चांगली वेबसाईट तयार केली आहे. प्रत्येकाचं सर्टिफिकेट तपासले जाणार आहे. पुढील काळात डिजीलॉकर सारखी व्यवस्था आपण उभी करणार आहोत. यातून अशाप्रकारचे घोटाळे होणार नाहीत, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान, दिव्यांग कल्याण विभागाचे प्रधान सचिव असलेल्या तुकाराम मुंढे यांनी पदावरू रुजू झाल्यापासूनच अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. मागाली काही महिन्यांत त्यांनी प्रामुख्याने बोगस प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळविणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली असून अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. दिव्यांगांच्या क्षेत्रात बेकायदेशीरपणे कार्यरत असलेल्या संस्थांवरही त्यांनी कारवाई केली आहे.
मुंढे यांनी ‘दिव्यांग सहाय्यक संकेतस्थळाचे (पोर्टल)’ आणि मोबाईल ॲप तयार केले आहे. या माध्यमातून दिव्यांगांना घरबसल्या अनेक सेवा उपलब्ध होणार आहेत. दिव्यांगांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. आधार आणि युडीआयडी लिंकमुळे लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण होण्यास मदत होणार आहे. तर टाईप करण्यास अडचण असलेल्या दिव्यांगांसाठी कृत्रिम प्रज्ञा आधारित व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि ‘व्हॉइस नोट्स’ची सुविधा या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या नव्या पोर्टल आणि मोबाईल ॲपमुळे दुबार आणि बनावट लाभार्थ्यांना आळा बसणार असून रुग्णालये आणि स्वयंसेवी संस्था एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने स्थानिक मदत मिळणे सोपे होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.